अशी माणसं कुठली राजकीय पार्श्वभूमी नसतानाही फक्त राज ठाकरेंकडेच कशी असतात..
शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करून,समाजातील विविध घटकांसाठी वेड्यासारखं काम करणारी ही माणसं…
मग सांगा ना…
अशी माणसं तुम्हाला आमदार खासदार म्हणून का नकोत…???
मनसेचा नवी मुंबई मध्ये पहिला नगरसेवक निवडून आला,
हे २० वर्ष वेड्यासारखा संघर्ष करणाऱ्या तेथील प्रत्येक स्थानिक मनसे कार्यकर्त्यांचं कष्टाचं फळ…❤️
काल राज ठाकरेंनी नवी मुंबईत भेट दिली…एवढ्या कठीण काळात ही राज ठाकरेंवरील प्रेम हे जरा सुद्धा हलत नाही ही आश्चर्याची गोष्ट !!!
भारताच्या अभिनय क्षेत्रातील एक महान ऋषी म्हणजे अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर !
त्यांच्या अभिनयातील साधेपणा आणि सहजता आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या या रत्नाला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा मानाचा मुजरा.
#दिलीपप्रभावळकर
सस्नेह जय महाराष्ट्र
केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे. 'NEET' पेपरफुटीने परत एकदा हे सिद्ध झालं. 'NEET' चा पेपर १० लाख रुपयांना विकत घेतला गेला. आणि याची मुळं सापडली महाराष्ट्रात. अर्थात हे पेपरफुटीचं जाळं देशव्यापी आहे. यांत 'NEET' साठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे.
हे सगळं झाल्यावर केंद्र सरकारने काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली. या आधी पण २०२४ ला सीबीआय चौकशी अशाच एका प्रकरणात लावली होती त्यातून काही साध्य झालं नाही. या सगळ्यात आपण आपलं काम केलं असा सरकारचा आविर्भाव आहे. पण २२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय ?
मुळात २०१६ ला 'NEET' लादण्याची गरजच नव्हती. पण सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी इतकी तीव्र आहे की मग काही लाख लोकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला तर काय फरक पडतो ? 'NEET' बद्दल मी २०१६ पासून आक्षेप नोंदवत होतो. या परीक्षांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते महागडे कोचिंग क्लासेस लावणार. पुढे हे क्लासवाले आर्थिक शक्तीच्या जोरावर परीक्षांचे निकाल हवे तसे वाकवणार हे मला दिसत होतं आणि सामान्य घरातील मुलं,मुली भरडली जाणार हे मला दिसत होतं आणि म्हणून २०१६ पासून आम्ही याला विरोध करतोय.
माझ्या सारखाच विरोध दक्षिणेतील नेत्यांनी पण केला. सध्याचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण 'NEET' रद्द करा म्हणून आग्रह धरत आहेत. कारण दक्षिणेतील ५ राज्य आणि महाराष्ट्र मिळून जवळपास ३५० च्या वर मेडिकल कॉलेजेस आहेत आणि वरती उत्तरेतली मोठ्या राज्यांमध्ये फक्त १८० मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामुळे उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टाहास २०१६ पासून सुरु आहे. आणि त्यासाठी कोचिंग क्लासेसचं सगळ्यात मोठं जाळं उत्तरेतल्या राज्यांत आहे. आणि व्यवस्था कशी वाकवायची हे त्यांना नीट माहित आहे. प्रश्न इतकाच आहे की अशा सडलेल्या व्यवस्थेतून जे डॉक्टर्स बाहेर पडतील त्यांच्या हातात आपण आपलं आरोग्य देणार आहोत का ? आणि का तर केंद्राला वाटलं की यापुढे मेडिकल प्रवेशासाठी एकच परीक्षा हवी म्हणून ?
आधी प्रत्येक राज्याची एक परीक्षा होती, त्याच्या आधी तर बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळायचा. समजा त्यात काही त्रुटी होत्या असं मान्य करू, मग त्या सुधारायच्या सोडून जी 'NEET' परीक्षा आणली ती अजून भीषण निघाली. या परीक्षेत कधी काही विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाल्याची उदाहरणं आहेत जे अशक्य वाटतं, कधी परस्पर ग्रेस मार्क्स दिलेत. थोडक्यात काय ज्याच्याकडे व्यवस्था वाकवायची शक्ती आहे त्याला पायघड्या घातल्या जाणार. सध्याचं सरकारचं बरं आहे की आमच्यासोबत आलात की तुम्ही स्वच्छ आणि आमच्या व्यवस्थेला एकदा शांत केलंत की मग तुम्ही काहीही करा.
प्रश्न असा आहे की मुळात मेडिकलच्या जागा कमी. त्यासाठी राष्ट्रव्यापी परीक्षा. तिचं काय होईल माहित नाही. दरवर्षी काहीतरी नवीन खेळ. काही वर्षांपूर्वी 'NEET' परीक्षेच्या गोंधळावर मी थेट पंतप्रधानांशी बोललो होतो, तेंव्हा प्रश्न सुटला. पण कायमस्वरूपी काही सुधारणा नाही.
बरं इतकी वर्ष एकच माणूस श्री. धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत. त्यांच्या काळात 'NEET' मध्ये इतके घोळ झाले, पण तरीही हे महाशय तिथेच बसलेत. बहुदा हिंदी देशभर लादण्याचा अजेंडा ते नेटाने राबवत आहेत म्हणून त्यांना ही बक्षिसी दिली आहे का ? माझी पंतप्रधानांना विनंती आहे की २२ लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अनेकदा खेळ करणाऱ्या तुमच्या या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या.
माझी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना पण विनंती आहे की जरा पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा. हे 'NEET' वैगरे काही नको आपल्याला. आपल्याला आपल्या राज्यातील मुलांशी घेणंदेणं आहे. महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर उपयोग काय तुमचा? सध्या पेट्रोल डिझेल वाचवतोय हे दाखवण्याचा जो संपूर्ण सरकारचा इव्हेन्ट सुरु आहे त्यातून बाहेर या. तुम्ही जे हे सगळं करत आहात हे एक दिवसाचं आणि एका फोटोपुरतं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोला आणि काहीतरी ठाम ( ठाम म्हणजे राज्याच्या हिताची, नाही तर केंद्र जे सांगेल त्याला रेटून हो म्हणणं याला ठाम भूमिका म्हणतील) भूमिका घ्या.
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र शासनाची माघार.
राज्यात मराठी भाषेची सक्ती करण्याऐवजी सरकार राज्यातील कर्मचारी ह्यांची हिंदी भाषेची परीक्षा घेण्यासाठी निघाले होते. ह्यांवर मनसे पक्षाच्या वतीने नेते संदीप देशपांडे ह्यांनी कडाडून विरोध केला होता.
अखेर सरकारने माघार घेतली.
@SandeepDadarMNS
नसरापूर घडलं तेव्हा बदलापूर आठवलं…पण न्याय अजूनही हरवलाय!
बदलापूर पीडितांना १० लाख मदत व शिक्षणाची घोषणा - पण वर्ष उलटलं तरी काहीच नाही.
शेवटी मदतीला पुढे येतात मनसे कार्यकर्ते !
मनसे ने भरली शाळेची फी… सरकार कुठे आहे ?
घटना झाली की सरकार जागं होतं,पण न्याय द्यायची वेळ आली की झोपतं का?
@PachangeSandeep@amitrthackeray@MNVS_Adhikrut
#नसरापूर #Badlapur #mns #Maharashtra #मनसे
आज महाराष्ट्र दिनी,
प्रत्येकाच्या स्टेटस ला,स्टोरीज ना,रिल फक्त राज ठाकरे दिसत आहेत…त्यांचाच आवाज आज सगळी कडे ऐकायला येत आहे…त्यांचीच भाषण दिसत आहेत…
हे का…?
तर त्या माणसाचं माय मराठी वर असलेलं निस्सीम निस्वार्थी प्रेम…❤️
इतर कोणत्या ही दुसऱ्या नेत्याच्या नशिबात हे नाही..
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?
वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.
मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?
बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.
पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.
माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.
मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील.
राज ठाकरे ।
राज ठाकरे ह्यांनी आजवरच्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची जणू उजळणीच घेतली. तुम्हाला राज ठाकरेंचे विचार पटो न पटो, परंतु प्रत्येक मराठी माणसांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आजचं भाषण ऐकलेच पाहिजे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिनाचा सोहळा आज पुण्यात पार पडला. #Pune
'आशाताई' -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे.
आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे तरी जे महाराष्ट्राच्या नवनिर्माणात सहभागी होऊ इच्छितात अशा प्रत्येकाने ह्या #मनसे_सदस्य_नोंदणी मध्ये सहभागी व्हावे.
खाली दिलेल्या QR कोड वर स्कॅन करून आपण ह्या नोंदणी अभियानात आपला सहभाग नोंदवू शकता.
सस्नेह जय महाराष्ट्र,
आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. काल छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझी सदस्य नोंदणी केली.
माझं महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना आवाहन आहे की या सदस्य नोंदणीतून तुम्ही महाराष्ट्र सैनिक नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात. आमच्यासाठी तुमची जात, धर्म, राजकीय विचारधारा यापेक्षा तुम्ही महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हे पुरेसं आहे. महाराष्ट्रासाठी असंख्य आंदोलनं करणारा पक्ष, अनेक समाजपयोगी उपक्रम चालवणारा पक्ष, आणि महाराष्ट्राचा विस्तृत विकास आराखडा मांडणारा हाच पक्ष आहे. येत्या काळात आम्ही अनेक असे उपक्रम घेऊन येत आहोत ज्यातून महाराष्ट्राच्या विकासाला एक दिशा देणं शक्य आहे, आकार देणं शक्य आहे. या सगळ्यात सामील होण्याची संधी तुम्हाला आहे. ही संधी सोडू नका.
तुम्ही फक्त सदस्य न होता जर सक्रिय सदस्य होणार असाल तर विशेष आनंद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात टाकत आहे, त्या प्रक्रियेत तुम्हाला योग्य संधी मिळेल हे मी स्वतः पाहीन.
सदस्य नोंदणीसाठी महाराष्ट्रभर माझे सहकारी शाखांच्या बाहेर, आणि गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स लावणार आहेत. तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष नोंदणी करायची असेल तरी हरकत नाही. नाहीतर खाली दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून देखील तुम्ही सदस्य नोंदणी पूर्ण करू शकता.
या सदस्य नोंदणीत महाराष्ट्राचे पाईक होणाऱ्या प्रत्येकाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवारात सहर्ष स्वागत !
आपला नम्र
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला २० वर्ष झाली. २० वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील.
२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण २० वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं! मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या कधी यश मिळालं कधी नाही मिळालं पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येईल.
गेल्या २० वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !
अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या १० मार्च २०२६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील !
त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा.
तुमचं मनःपूर्वक स्वागत असेल.
आपला नम्र
राज ठाकरे ।