मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई आणि पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत अनेक मोठे दावे केले होते. मात्र, पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. महापौर पाहणी करत असताना चक्क त्यांच्या समोरच एक व्यक्ती साचलेल्या पाण्यात पडली.
अखेर वरुणराजानेच महापालिकेच्या गैरनियोजनाची पोलखोल केली.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांनी आज दिली येथे पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पक्षफोडी, राम मंदिराच्या दानपेटीतील भ्रष्टाचार, आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर चुकीच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. या संवादातील काही ठळक मुद्दे..
"लाखो कोटींचे महामार्ग करायला पैसे आहेत, मग शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची दानत सरकारमध्ये का नाही?";आमदार व विधिमंडळ पक्षनेते मा. जयंतराव पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नियम २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चेत शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च, आयात धोरण आणि दुष्काळाच्या संकटावर सरकारचे लक्ष वेधले.
कर्जमाफीचे श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारे निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २००८ मधील केंद्र सरकारच्या कर्जमाफीपासून ते राज्यातील विविध कृषी योजनांचा उल्लेख करत त्यांनी मागील सरकारांच्या योगदानाची आठवण करून दिली. वाढत्या खतांच्या किंमती, कापूस उत्पादकांवरील आयात धोरणाचा परिणाम, शेतकरी आत्महत्या आणि फळबागांच्या नुकसानीबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन, दुष्काळासाठी ठोस नियोजन आणि शेतमालाला न्याय्य दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ घोषणांच्या माध्यमातून नव्हे, तर निर्णयक्षमतेने पाहण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
#प्रश्नोत्तरे : आमदार व विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील 'प्रश्नोत्तरे' काळात राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
ड्रग्सचा व्यापार हा केवळ गुन्हेगारांच्या बळावर नव्हे, तर काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच वाढत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना थेट जबाबदार धरल्याशिवाय आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ड्रग्स हे काळ्या पैशाचे मोठे स्रोत बनले असून, पोस्टिंगपासून ते स्थानिक पातळीवरील संरक्षणापर्यंत संपूर्ण साखळीची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अमली पदार्थांविरोधातील लढाईत सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून पोलीस यंत्रणेला उत्तरदायी बनवावे, अशी मागणी त्यांनी केली.
#प्रश्नोत्तरे : आमदार व विधिमंडळ पक्षनेते मा. जयंतराव पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील 'प्रश्नोत्तरे' काळात राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. ड्रग्स विरोधातील कारवाईत काही भ्रष्ट पोलिस अधिकारी गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली.
ऑनलाइन माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचणाऱ्या ड्रग्सच्या जाळ्याबाबत त्यांनी सरकारला सावध करत, Narcotics Cell अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच बंदरे, वाहतूक मार्ग आणि पुरवठा साखळीवर विशेष लक्ष ठेवून ड्रग्स माफियांविरोधात व्यापक मोहीम राबवण्याची मागणी त्यांनी केली.
तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी रोज आढावा घेऊन या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्राने संपूर्ण देशाला स्त्री-पुरुष समानतेचा महत्वाचा दृष्टीकोन दिला. यातील सर्वात मोठे पाऊल म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली २२ जून १९९४ साली जाहीर झालेले महाराष्ट्राचे महिला धोरण…! या धोरणाने महिलांना राजकीय तथा सामाजिक क्षेत्रात फार मोठी संधी निर्माण झाली. महिला धोरण हे ‘महिलांच्या मुक्तीचा जाहीरनामा‘ आहे असे या धोरणाच्या मसूद्यातच नमूद केले होते. याचे वैशिष्ट म्हणजे सर्व कायदे बदलांची सुरुवात स्त्री-पुरुष समानतेच्या आधारावर होणार होती. सरकारच्या या भूमिकेमुळे प्रशासन व राजकारणास एक निर्णायक वळण मिळाले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्राने १९९५ साली म्हणजे महिला धोरणाच्या एक वर्षानंतर महिलांच्या कल्याणाच्या संदर्भाने जागतिक स्तरावर ‘प्लॅटफॉर्म ऑफ ॲक्शन’ हा महत्वपूर्ण दस्तावेज तयार केला. तो जगातील बहुतांश देशांनी स्वीकारला. या पार्श्वभूूमीर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने स्वीकारलेले स्त्री-पुरुष समानतेचे महिला धोरण अतिशय महत्वपूर्ण पाऊल ठरते. या धोरणाने आज ३२ वर्षे पुर्ण केली असून वेळोवेळी त्यामध्ये कालासुसंगत असे बदल करण्यात आले आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांमध्ये अभिप्रेत असणाऱ्या समानतेचे तत्व रुजविण्यात या धोरणाने अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या धोरणाच्या ३२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्त्री-पुरुष समतेचा विचार बुलंद होत राहावा ही सदिच्छा.
महिलांना शिक्षण, राजकीय सहभाग आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या संधी देणाऱ्या, समाजाच्या प्रत्येक स्तरावर स्त्रीशक्तीला सक्षम व स्वयंपूर्ण बनविणाऱ्या, अन्याय, असमानता व भेदभावाविरुद्ध ठामपणे उभे राहत महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या, महाराष्ट्र महिला धोरणाच्या प्रेरणादायी व ऐतिहासिक ३२ व्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!
योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचा संतुलित संगम साधणारी जीवनशैली आहे. निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा देत योग आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्याची दिशा दाखवतो. दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करून निरोगी आणि सशक्त समाज घडवूया. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
पराक्रम, स्वाभिमान आणि अदम्य शौर्याची तेजस्वी गाथा घडवणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करत इतिहासात अमर स्थान मिळवले. त्यांचे साहस, राष्ट्रनिष्ठा आणि त्यागाची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात चेतना जागवते. दिव्य तेजस्विनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
सत्यशोधक विचारधारेचे अग्रदूत गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या परखड लेखणीने आणि प्रखर विचारांनी समाजप्रबोधनाची नवी दिशा दिली. अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता यांविरुद्ध त्यांनी उभा केलेला वैचारिक लढा आजही प्रेरणादायी आहे. गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
स्वराज्याची प्रेरणाशक्ती, संस्कार, शौर्य आणि दूरदृष्टीचा अखंड दीप प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वराज्याच्या पायाभरणीला सामर्थ्य दिले. त्यांच्या विचारांतून राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि कर्तव्यपरायणतेचा अमूल्य वारसा लाभला. स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन.
मोदी सरकारच्या फसव्या आश्वासनांचा महाविकास आघाडीकडून निषेध !
महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर शहरातील जुन्या नगरपालिकेसमोर मोदी सरकारच्या गेल्या बारा वर्षांतील कथित फसव्या घोषणा व अपूर्ण राहिलेल्या आश्वासनांचा निषेध करण्यात आला. यावेळी विविध आश्वासनांचे फलक गॅस फुग्यांना बांधून हवेत सोडण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा अनोखा आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष किशोर पाटील, राजाराम खरात, काँग्रेस पक्षाचे प्रदीप रोकडे, आर. के. गटाचे शहराध्यक्ष अशोक गजरमल, प्रिया गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव राजेश वानखेडे, प्रशांत कनोज, हेमंत पाटील, नागेश बरे, वंदना भगत, संपदा लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू काळे, अशोक पेंडुलकर, विष्णू सानप, अजय गीते तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर हे करोडो भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. पण याच केंद्रात सामान्य भक्तांच्या श्रद्धेची थट्टा केली जात आहे. कारण सामान्य भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दिलेल्या दानातील जवळपास २०० कोटी लंपास केले गेले आहेत.
भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेले दान नेमके कुठे गेले, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो भक्तांनी आस्थेने दिलेला निधी जर देवापर्यंत पोहोचत नसेल, तर हा केवळ आर्थिक घोटाळा नसून भक्तांच्या श्रद्धेची फसवणूक आहे.
अशाचप्रकारे महाराष्ट्रातील अनेक हिंदू देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हडप करण्यात आल्या आहेत. या जमिनीच्या चोरीला संरक्षण देणारा कायदा आणण्यापूर्वी त्या जमिनी मूळ देवस्थानांना परत मिळाल्या पाहिजेत, हीच न्याय्य भूमिका आहे.
धर्म, देव आणि श्रद्धा ही राजकारणाची साधने नसून समाजाच्या विश्वासाचा पाया आहेत. त्यामुळे किमान देवाच्या दरबारात तरी संपूर्ण पारदर्शकता असली पाहिजे.
#श्रीराम_मंदिर #अयोध्या #धर्म
मायबाप शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज प्रत्यक्ष उपस्थित राहिलो.
बळीराजाला वाऱ्यावर सोडून केवळ आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी हा लढा उभारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा संघर्ष, जिद्द आणि एकजूट अधिक बळकट झाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत आणि रास्त मागण्या सरकारदरबारी ठामपणे मांडल्या जात आहेत.
२०१९ च्या कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची जाचक अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी, २ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वअट न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी, पीकविमा योजनेतील शेतकरीविरोधी अटी रद्द करून १ रुपयात पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, २०१७ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा.
पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे पुनर्गठन करून त्यांच्या खात्यात पेरणीसाठी थेट आर्थिक मदत जमा करणे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत अन्नदात्याला न्याय मिळत नाही आणि या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील, याची सरकारने गंभीर दखल घ्यावी.
@RRPSpeaks@NCPspeaks
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग #शेतकरी_लढा #विनाअट_सरसकट_कर्जमाफी #NCP_SP #जय_जवान_जय_किसान
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब हे गेल्या तीन दिवसांपासून रोज पाठिंबा देण्यासाठी अन्नत्याग आंदोलन स्थळी दिवसभर उपस्थित राहत आहेत. त्यांची शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा आणि तळमळ निश्चितच वाखणण्यासारखी आहे, शिवाय त्यांच्या उपस्थितीमुळं आम्हालाही लढण्यास नवी ऊर्जा मिळते, हे अधिक महत्त्वाचं आहे. धन्यवाद प्रा. लक्ष्मण ढोबळे साहेब..!
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग_आंदोलन
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी #पंढरपूर
पंढरपूरमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद (खांडवी) नांदुरा-बुरहानपुर महमार्गावर (जि. बुलढाणा) रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामध्ये शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोणत्याही अटीशर्तीशिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ, महादेव भालतड़क, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, विठ्ठल वाघ, करीम खान, सिद्धार्थ हेलोड़े, सुभाष कोकाटे, अनंता वाघ यांच्यासह शेकडो शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग_आंदोलन
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी #पंढरपूर