दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड करण्यासाठी, देशभरातून आलेली अनेक बोधचिन्ह माझ्याकडे पाठवण्यात आली होती. त्यातील राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेले बोधचिन्ह मला आवडलं आणि ते निवडावं असं सुचवलं. साहित्य संमेलन समितीने देखील ते स्वीकारलं.
आज पुण्यात साहित्य परिषदेच्या कार्यालयात या बोधचिन्हाचे अनावरण झाले, या अनावरणाच्या प्रसंगी मी माझं छोटंसं मनोगत मांडलं, त्यातील काही महत्वाचे मुद्दे.
१) महाराष्ट्राची साहित्याची परंपरा उज्वल आहे, साहित्य संमेलन भरवणारे देखील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावं. खरंतर अशा कार्यक्रमात काय किंवा साहित्य संमेलनात काय राजकारण्यांना बोलवायची गरज नाही. साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं असंच असलं पाहिजे.
२) सध्या महाराष्ट्राची एकूणच परिस्थिती प्रचंड खालावली आहे, राजकारण्यांची भाषा तर प्रचंड खालच्या पातळीवर गेली आहे, अशा राजकारण्यांना साहित्यिकांनी चांगलच ठणकावलं पाहिजे.
३) महाराष्ट्रात सध्या वाट्टेल ते सुरु आहे. नेते जाळ्यांवर उड्या काय मारत आहेत, खरंतर महाराष्ट्रात असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत.
४) देशाला विचार देणारा, दिशा देणारा आपला महाराष्ट्र होता, पण तो आज कुठल्या खालच्या थराला येऊन थांबला आहे? रोज सकाळी उठून वाट्टेल ते बोलणारे, वाट्टेल त्या भाषेत बोलणारे, राजकीय नेते दिसत आहेत. आणि महाराष्ट्राच्या या अधःपतनाला दूरचित्रवाणीच्या वाहिन्या पण तितक्याच जबाबदार आहेत. आपण काहीही बोललो तरी ते दाखवलं जातं हे माहित असल्यामुळे हे नेते वाट्टेल ते बोलत सुटलेत. आज जी मुलं लहान आहेत, ज्यांना राजकारणात यायचं आहे अशा मुलांना वाटत राहणार, असं अद्वातद्वा, अर्वाच्य बोलणं म्हणजेच राजकारण. म्हणूनच साहित्यिकांनी राजकारण्यांचे कान धरले पाहिजेत आणि साहित्यिकांनी आपण ट्रोल होऊ याची भिती अजिबात बाळगू नये. तुम्ही बोललंच पाहिजे. साहित्य संमेलनं होतील, पुस्तकं येतील, आम्ही ती वाचत राहू, पण अशा प्रकारची साहित्यिक चळवळ उभी करावी लागेल की, ज्यातून राजकारणातील घसरणारी भाषा ही सुधारली पाहिजे.
५) साहित्यिकांनी राजकारण्यांना सांगायचं की, त्यांनी काय करावं आणि राजकारण्यांनी ते ऐकावं अशीच परिस्थिती असली पाहिजे.
माझ्या पक्षाचे नेते श्री. संदीप देशपांडे यांनी व्हिजन वरळी नावाचं एक वरळी विधानसभेच्या विकासाबद्दलच्या कल्पनांचं प्रदर्शन भरवलं आहे. त्याच्या उदघाट्न सोहळ्यात मी उपस्थितांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे...
१) वरळीतील बीडीडी चाळीत मी लहानपणासून कधी वडिलांबरोबर तर कधी बाळासाहेबांसोबत यायचो. आमचे एक डॉक्टर इथेच बीडीडी चाळीत रहायचे. त्यामुळे माझ्या या भागाबद्दलच्या आठवणी खूप जुन्या आहेत.
२) गेली अनेक वर्ष इथल्या बीडीडी चाळीचा प्रश्न प्रलंबित आहे, पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रलंबित आहे, कोळीवाड्यातील समस्या जैसे थे आहेत. हे सगळं बघून त्रास होतो.
तुम्ही महाराष्ट्राचे मालक ना ? तरीही तुम्हाला त्रास कसा दिला जाऊ शकतो? बाहेरच्या राज्यातील लोंकाना इथे घर मिळतात, ते इथे येऊन झोपड्या वसवून फुकटात घरं घेऊन जातात... याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही... आणि समोरच्यांना माहीत आहे की हे जाऊन जाऊन जाणार कुठे ? मुळात तुम्हाला या व्यवस्थेच्या लेखी किंमत नाही.
३) एखादा प्रकल्प येताना तुम्हाला का विचारलं जात नाही? आणि हे फक्त वरळीत नाही तर महाराष्ट्रभर घडतंय... आणि जिथे जिथे हे घडतंय तिथे बघा जास्त टक्का मराठी आहे. असुनी मालक घरचा चोर म्हणती त्याला अशी परिस्थिती झाली आहे आपली... आणि हे का होतं?
कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करून आमदार, खासदार निवडून देताय, मग काय तुम्हाला ते गृहीतच धरणार... तुम्हाला स्वाभिमानाने उभं रहायचं असेल, तो स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या..
४) आपल्याकडे कुठलंही शहर असू दे मग ते मुंबई का पुणे शहरं असू देत ती वेडीवाकडी पसरली आहेत, या शहरांमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन असतो पण टाऊन प्लॅनिंग नसतं. मग कुठल्याही पायाभूत सुविधांचा विचार न करता फक्त आणि फक्त बांधकामं सुरु राहतात. आणि तुम्ही सगळे स्क्वेअर फुटांच्या खेळात अडकून पडता. तुमची जागा घेणाऱ्या बिल्डरांना तुम्ही प्रश्नच विचारत नाहीत, मुळात बिल्डरांना तुमच्याशी घेणंदेणं नाही आणि त्यात तुम्ही ज्या राजकारण्यांना निवडून देता, त्यांना पण तुमच्याबद्दल काही वाटत नाही.
५) मला अनेकदा वृत्तवाहिन्या पुढच्या १० वर्षात महाराष्ट्र कसा दिसतो, व्हिजन महाराष्ट्र अशा प्रकारच्या कार्यक्रमात बोलवतात... राज्याची व्हिजन १० वर्षांची नाही तर राज्य, देश कसा घडवणार याचं १०० ते २०० वर्षांचं नियोजन पाहिजे, तसा विचार पाहिजे. १० वर्षात काही होत नसतं...
१० वर्षात अधिक वाट लागते. ३०,४० वर्षांपूर्वीची मुंबई ज्यांनी पाहिली असेल, तर त्यांना आठवत असेल या शहराला एक कॅरेक्टर होतं. आपली बेस्टची लाल रंगाची बस होती, काळीपिवळी टॅक्सी होती. ती बघितली की हे शहर म्हणजे 'मुंबई' हे कळायचं. आज देशात कुठल्याच शहराला ओळख राहिली नाहीये. सध्या शहरांची ओळख ही फक्त फ्लायओव्हर्स झाली आहे. आणि हे फ्लायओव्हर्स होत आहेत ते बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठी. आणि सगळ्या लोंढयांना सुविधा देण्यात इतके पैसे खर्च होतात की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांसाठी काही करायचं तर पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे...
६) इथल्या मूळच्या माणसांना सगळ्या आवश्यक त्या गोष्टी मिळाल्या, तो सुखी झाला आणि मग बाहेरचा कोणी आला तर आम्ही समजून घेऊ. पण आहे त्यांनाच काही मिळत नाहीये, आणि बाहेरच्यांना देण्यासाठी या राज्याचा सगळा पैसा खर्च होणार असेल तर हे कसं चालणार? निवडणुका, राजकारण यांत सगळे मूळ विषय बाजूला पडतात. सत्ताधारी असोत की विरोधी पक्ष असू देत, सगळे एकसारखेच वागतात.
७)अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय काँग्रेसच्या सरकारपासून सुरु होता. तेंव्हापासून मी सांगत होतो की समुद्रात पुतळे उभारण्यापेक्षा, महाराजांचे गडकिल्ले हे त्यांचे खरं स्मारक आहे, त्याची नीट देखभाल करा, पण नाही. आत्ता मध्ये महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत एक दुःखद घटना घडली. अहो तो पुतळा जमिनीवर होता, जो सुद्धा आपल्याला नीट उभारता नाही आला, इथे तर समुद्रात उभारायचा म्हणत आहेत.
८) आपल्याकडे कोणाच्या डोक्यात काय कल्पना येतात ते सांगता येत नाहीत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्यापेक्षा २ इंच मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणार अशी घोषणा केली गेली. मुळात ज्यांनी कोणी घोषणा केली त्यांनी तरी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा पाहिला आहे का? त्यांना शिल्पकला कळते का ? महाराजांचा असा अश्वारूढ पुतळा उभारायचा ठरवला तर तो अश्व किती मोठा असावा लागेल? कोण शिल्पकार तो उभारणार आहे? आणि समुद्रात जर असा पुतळा उभा करायचा असेल तर किमान २० ते २५ हजार कोटी रुपये लागतील. मला सांगा या २० ते २५ हजार कोटींत आपले गडकिल्ले किती छान होतील. आपल्याला येणाऱ्या पिढ्याना महाराजांनी उभारलेले गडकिल्ले दाखवायचेत का महाराजांचा पुतळा ?
९)संदीप देशपांडे हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा आहे. जे घडू शकतं त्याला हो म्हणणारा आहे आणि जे घडू शकत नाही त्याला नाही म्हणणारा आहे. तो आमचा हिरा आहे. त्याने जे व्हिजन वरळी प्रदर्शन सुरु केलं आहे, ते नीट शांतपणे बघा. बाहेरचे येऊन इथे पुन्हा सगळी वाट लावली आहेत आणि लावतील हे विसरू नका. संदीपसारखे जे चांगलं काम करणारे आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बसणार आहे का नाही? की ज्यांनी राजकीय आणि सामाजिक गोंधळ घातला आहे त्यांना परत संधी देणार का? वरळी खूप सुंदर भाग आहे... या वरळीसाठी जे जे माझ्याकडून होणं शक्य आहे ते होईल, ते ते मी करेन आणि या बाबतीत मला बिनदिक्त गृहीत धरा.
#व्हीजन_वरळी
काल काही तासाच्या पावसाने सगळ खोळंबल !
यंदा पाऊस मोठया प्रमाणावर आहे.
ज्या ठिकाणी यापूर्वी महापूर येऊन गेला आहे. तिथे त्वरित अतिक्रमण काढावी.
सांगली व कोल्हापूर आणि चिपळूण शहरात प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
नदी मधील गाळ काढला गेला का ? हे बघणे गरजेचे आहे.
#पाऊस
तळकोकणातील 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा'च्या कणकवलीच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे :
- शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे जुनेसहकारी आणि मित्र आहेत.
- जितकं आपलं तळकोकण देखणं आहे तितकीच इथली जनताही सुजाण आहे कारण महाराष्ट्र राज्याला ९ भारतरत्न आहेत त्यापैकी ७ भारतरत्न एकट्या कोकणातून येतात.
- माझी राजकीय वाटचाल आडेवेढे घेणारी नसते... सरळ आणि सुस्पष्ट असते. एखादी भूमिका पटली तर मी समर्थन करतो आणि नाही पटली तर टोकाचा विरोध करतो.
- २०१४ ते २०१९ मोदी सरकारकडून जी धोरणं आखली गेली त्यातल्या ज्या नाही पटल्या त्यांना २०१९ निवडणुकांमध्ये दाखवून जाहीर विरोध केला. नोटबंदी, पुतळ्यावर खर्च करणं अशा अनेक बाबी आजही नाही पटत.
- पण जेव्हा काश्मीरमधलं ३७० कलम रद्द झालं, तेव्हा पहिलं अभिनंदन करणारा मीच होतो.
- देश स्वतंत्र झाल्यापासून ३७० कलम रद्द करा ही मागणी होती. का? तर आपल्या देशाच्या भागात काश्मीरमध्ये एक इंचही जमीन खरेदी करू शकत नाही. असं ३७० कलाम आज मोदी सरकारने रद्द केलं हे मान्यच करावं लागेल.
- राम मंदिर उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. आताच सुप्रीम कोर्ट आणि प्रामुख्याने सत्तेत श्री. नरेंद्र मोदी नसते तर हे राममंदिर उभं राहिलंच नसतं.
- मित्राची खरडपट्टी काढताना आपण मागेपुढे पाहू नये आणि शत्रूची स्तुती करतानाही आपण मागे पुढे पाहू नये.
- २०१९ च्या निवडणुकांमध्ये माझी मांडणी लक्षपूर्वक ऐका आजच्या विरोधी पक्षांची बोलायचीही हिंमत होणार नाही इतके तीक्ष्ण प्रश्न मी उपस्थित केले होते कारण ते माझा हेतू शप्ष्ट होता तो विरोध फक्त धोरणांसाठीचा होता. मला काहीतरी हवं म्हणून नव्हते.
- श्री. उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते.
- कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत असं श्री. उद्धव ठाकरे म्हणाले. मला एकंच प्रश्न विचारायचा आहे, वर्ष २०१४ ते २०१९ तुम्ही भाजप बरोबर सत्तेत होतात नंतर २०१९ ते २०२२ स्वतः मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत?
- उद्योगधंदा आला कि उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणतं पक्षाचं धोरण ?
- अणुऊर्जा प्रकल्प आला तर नाश होईल असा प्रचार जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध झाला. पण देशात तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, तारापूर (महाराष्ट्र) इतके अणुऊर्जा प्रकल्प भारतात आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भाभा अणू संशोधन केंद्र मुंबईच्या मध्यात आहे मग उद्या तिथे काही विस्फोट झाला तर... असे प्रकल्प निर्धोक सुरु असताना का आणि कसली भीती घातली जाते आहे.
- नाणारला विरोध केला. तिथे हजारो एकर जमिनी कशा विकत घेतल्या गेल्या ? मग बारसू तिथेही ५००० एकर जमीन आधीच विकत घेतली होती. प्रकल्प कुठे येणार हे दलाल - अधिकारी - राजकारणी ह्यांना आधीच माहित असतं मग त्या जमिनी कवडीमोल दराने विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने सरकारला विकायच्या. हे कोणतं षडयंत्र ? कोण रचतंय ? ह्यावर खासदाराने लक्ष ठेवायला हवं होतं ना?
- कोकण रेल्वे किती वेगात पूर्ण झाली कारण तेव्हा जमिनीचे दलाल फिरत नव्हते.
- कोकणात चांगले उद्योग यावेत, प्रदूषणमुक्त उद्योग यावेत.
- गोवा राज्य फक्त पर्यटनावर सुरु आहे मग आपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग का नाही ?
- परदेशी पर्यटक आले कि आपल्या काही लोकांचं पालुपद असतं कि 'संस्कृतीवर घाला येतो. संस्कृती बिघडेल' वगैरे. दोन वेळेचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती. आपल्याच मुलांच्या हाताला रोजगार मिळेल. आपल्या लोकांच्या हाती पैसे येईल.
- परदेशी पर्यटक आल्याने गोव्याची, केरळची संस्कृती बिघडली का? तिथली संस्कृती रसातळाला गेली का? नाही. पर्यटक येतील, आपल्या प्रदेशाचा आनंद घेतील, चांगले पैसे इथे खर्च करतील आणि जातील.
- मी मलेशियाला गेलो होतो. मलेशिया हा मुस्लिम देश आहे. मुस्लिमांमध्ये दारू पिणं आणि जुगार खेळणं वर्ज्य मानलं जातं. तिथे जेंटिंग हाईलँड्स म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर दारू आणि कसिनोचा आनंद घ्यायला लोकं येतात. आम्हीही तिथे गेलो पण मला जुगार खेळात येत नाही फक्त ५ वर्षातून एकदा जुगार खेळतो.
- मलेशियाच्या एका रेस्टोबारमध्ये एक पाटी दिसली 'मुस्लिमांना प्रवेश नाही'. मी विचारपूस केली, तेव्हा कळलं. त्यांची धार्मिक मान्यता काहीही असली तरी पर्यटन आणि त्यातून आर्थिक सुबत्ता येणार असेल तर त्यांनी धर्म बाजूला ठेवला. मग आपण कोणती संस्कृती घेऊन बसलोय.
- गोवा, केरळ अशी बाकीची राज्य पुढे जात आहेत आपण तारकर्ली घेऊन बसलोय.
- आपलं कोकण जैविविधतेने इतकं समृद्ध आणि सुंदर आहे की, जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेझॉन नंतर ह्या सह्याद्री पश्चिम घाटाची दखल घेतली जाते. आपल्याला त्याची जाणीवच नाही.
- माझी नारायणराव राणे ह्यांना विनंती आहे. जगातील सुसज्ज हॉटेलची साखळी उभी करा. परदेशी पर्यटकांशी बोलायला इंग्लिश स्पिकिंग क्लासेस आणा.
- नारायणराव राणेंना मुख्यमंत्रीपदाचे फक्त ६ महिने मिळाले ते जर पुढची ५ वर्ष मिळाली असती ना तर कुणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती. ते ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा मलाही प्रश्न पडला होता कि मुख्यमंत्री पदाचा आवाका पाहता नारायणरावांना हे जमेल का? पण त्यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं, हाताळलं ते भल्याभल्यांना नाही जमलं आहे.
- झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल.
- मी, सन्मा. बाळासाहेब असे कधी गप्पांना बसायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे अंतुलेनंतर कुणी कामाचा वाघ बघितला असेन तर आपले नारायणराव राणे.
- एखादा विषय समजून घेणं आणि समजल्या नंतर तो मांडणं... ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो. नारायणराव राणे विरोधी पक्षनेते होते तेव्हा माझे आजचे सहकारी अनिल शिदोरे एकेदिवशी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय बंगांना घेऊन त्यांना भेटले. श्री. बंगांनी बालमृत्यू, कुपोषण ह्या समस्येबद्दल नारायणरावांना माहिती दिली. दुसरी दिवशी सभागृहात नारायणरावांनी तो विषय ज्या विस्तृतपणे, अभ्यासपूर्ण तासभर मांडला त्यावर बालमृत्यू, कुपोषण प्रश्नावर काम करणारे अभय बंगही बेहद्द खुश होते. असा माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गवासियांना माझी विनंती आहे कि, तुम्हाला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार पाहिजे कि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून तळकोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे.
- कोकणाबद्दलची जी काही मतं आहेत, माझ्या ज्या कल्पना आहेत ते मी नारायणराव राणेंकडे घेऊन गेल्यावर ते चालढकल करणार नाहीत. त्या विषयांना न्याय देतील हा मला विश्वास आहे.
- माझा कोकणी माणूस आज उद्योग नाही, सुबत्ता नाही म्हणून कोकण सोडतो. त्या कोकणी माणसाला आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हायची पुन्हा वेळ येणार नाही ह्यासाठी आम्ही काम करू.
- येत्या ७ मे ला, श्री. नारायणराव राणे ह्यांना प्रचंड मतांनी विजयी कराल, हि अपेक्षा.
#लोकसभानिवडणूक२०२४ #कोकण #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #LokSabhaElection2024 #RatnagiriSindhudurg #Kokan #SahyadriWesternGhats #RajThackerayVision
शिवसेना, मनसे ते महायुतीला पाठींबा, राज ठाकरेंचं "राजकारण"
मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची मुलाखत, उद्या रात्री ९.३० वाजता.
आपल्या बोलभिडू यु ट्यूब चॅनेलवर…
@RajThackeray@mnsadhikrut#राज_ठाकरे#मनसे
पुर्वी शिवसेना उमेदवार यांना तिकीट भेटले की ते आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जात असे.
आज
शिवसेनेचे तिकीट भेटले म्हणून उमेदवार शिवतीर्थ येथे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे.
ही ताकद सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आहे.
#साहेब
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील माझ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी मी संवाद साधला, त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे
१) एखाद्या व्यासपीठावर दोन पक्षांचे प्रतिनिधी एकत्र आले म्हणजे युत्या, आघाड्या झाल्या असं होत नसतं. माझे नेते आणि मी महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेत आहोत, तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत आहोत. जे काय सांगायचं ते योग्य वेळ आली की सांगेनच.
२) महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या जो विचका झाला आहे तसा मी ह्या आधी कधीच पाहिला नव्हता. आता जनतेनेच ह्यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे, अन्यथा ह्यांना असंच वाटत राहणार की आमचं कोणीच वाकडं करणार नाही. आणि जनतेने वेळीच पाऊल उचललं नाही तर महाराष्ट्राचं राजकारण अजून गाळात जाईल.
३) वरती केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरु आहे ते चूकच आहे. आणि फक्त आजच्यापुरता विचार करून चालणार नाही. आज अनेक तरुण तरुणी राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासमोर काय आदर्श आपण ठेवतोय? त्यांच्यासमोर जर शिवीगाळ करणारे, एकमेकांना वाट्टेल ते बोलणारे असे आदर्श असतील तर ते तरी का येतील राजकारणात?
४) मी जे आधी बोलतो ते कालांतराने लोकांना पटतं. मी जे बोलतो ते कायम विचारपूर्वक बोलतो. मराठा आरक्षणाबद्दल मी आधीच बोललो होतो, तसंच मतदान पण ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर घ्या हे मीच आधी बोललो होतो. जगभरात सर्वत्र जर मतदान मतपत्रिकेवर होत असेल तर ते भारतात ईव्हीएमवर का हा माझा प्रश्न तेंव्हाही होता आणि आज पण आहे. मध्यंतरी एक बातमी आली होती की मतदान झाल्यावर तुम्हाला एक स्लिप येणार, त्याचं काय झालं ?
५) महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची स्थिती भीषण आहे, अनेक भागांत दुष्काळ आहे, ह्या सगळ्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्रात मराठी मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळत नसेल त्यांना नोकऱ्या मिळत नसतील आणि महाराष्ट्र इतकं समृद्ध राज्य असून जर असं होत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
६) आपल्याकडचे महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकलेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज आठवलेत. महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटत असावं म्हणून ते बहुधा त्यांचं नावच घेत नव्हते आणि आता अचानक त्यांना महाराजांची आठवण येत आहे.
७) आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, एखादा माणूस इतक्या थराला का जातो ह्याचा विचार पण करावा लागेल. इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची स्थिती कोणी आणली ह्याची पण चौकशी व्हावी.
८) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवा पण आज किती राजकारण्यांना मराठीचा अभिमान आहे, किती प्रेम आहे त्यांना भाषेबद्दल? अशी लोकं काय मराठी भाषेसाठी पाठपुरावा करणार आहेत. मी नेहमी सांगतो की राज्यात हे तिथलेच स्थानिक पक्ष हवेत. कारण त्यांना त्या राज्याविषयी, त्या राज्याच्या भाषेविषयी आस्था असते.
My 1st Marathi literature book published with the present of Amar Habib, Tinhi tanker, Padhmshree, Girish Prabhune, Ex MLA, Dr. Sudhir Tambe, Prof. Milind Joshi, Educationist, Mr. Sandip Wakchore, Journalist, Mr. J. D. Paradkar, Mr. Ghanshyam Patil, Owner of Chaprak Prakashan.