प्रशांत महासागरात पाणी तापतं.. आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या विहिरीतील पाण्यावर दिसतो!
हे वाचून आश्चर्य वाटेल.. पण हे वास्तव आहे..
भारताच्या हवामान विभागाने नुकतीच "एल निनो''ची अधिकृत घोषणा केली आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यपणे वाढत असून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. नेमका हाच काळ महाराष्ट्रातील खरीप हंगामाचा कणा असतो..
एल निनो वर्षात काय होतं? पाऊस वेळेवर सुरू होतो.. मध्येच खंड पडतो.. कधी उशिरा येतो. एकूण पावसाचं प्रमाण घटतं आणि विरोधाभास म्हणजे अतिवृष्टीच्या घटनाही वाढतात.. पावसाचं प्रमाण कमी झालं की मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव वाढतो. थोडक्यात एल निनो हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सावधानतेचा इशारा आहे..
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्य पिकांना ऑगस्टमध्ये दीर्घ खंड पडल्यास सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे..
मग आता शेतकऱ्यांनी काय करावं?
काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्त्वाचं आहे.. आणि ती काळजी घेण्यासाठी चार गोष्टी कराव्या लागतील.
१) पहिली गोष्ट म्हणजे या हंगामात कमी कालावधीच्या आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांच्या जातींची निवड करावी. पाऊस अनिश्चित असताना दीर्घ कालावधीच्या पिकांवर संपूर्ण भिस्त ठेवणं धोक्याचं ठरू शकतं..
२) दुसरी गोष्ट म्हणजे आंतरपीक. कोणतंही पीक लावताना त्यात आंतरपीक घ्यायलाच हवं. कापूस किंवा तूर लावली तर त्यात मूग, उडीद आंतरपीक म्हणून लावता येतात. एखादं पीक गेलं तरी दुसऱ्या पिकातून काही ना काही हाती राहतं.. हा साधा हिशोब आहे पण तो जगवतो.
३) तिसरी गोष्ट म्हणजे गादीवाफ्यावर पेरणी. अतिवृष्टी झाली तर पाणी सरीतून निघून जातं.. पावसात खंड पडला तर गादीवाफ्यातील ओलावा जास्त काळ टिकून राहतो. दोन्ही परिस्थितींत गादीवाफा शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो.
४) चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि पीक विमा. ठिबक आणि तुषार सिंचन यावेळी खऱ्या अर्थाने कामाला येतं.. शेततळं खराब असेल तर आत्ताच स्वच्छ करून ठेवावं. आणि पीक विमा.. कोणतीही वेळ सांगून येत नाही. विमा काढून ठेवल्यास कुठल्याही नैसर्गिक संकटाला तोंड देण्याची ताकद येते.
एल निनो हे संकट आहे.. पण प्रत्येक संकटाचं संधीत रूपांतर करणं महाराष्ट्राच्या मातीने आपल्याला शिकवलं आहे. तयारी असेल तर संकट लहान होतं.. आणि तयारी नसेल तर छोटी गोष्टही मोठी होते.. शेतकरी सजग राहिला तर एल निनोही त्याला थांबवू शकत नाही..
तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय काय तयारी केलीये? कमेंट मध्ये नक्की सांगा..
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर.
रस्ते विकासाचा अभ्यासक म्हणून सांगतोय.. मिसिंग लिंक मुळे काय नेमका फायदा झाला.. अगदी गणित मांडून!
अर्धा तास वाचल्याने काय मोठा फरक पडणार? विषय फक्त अर्ध्या तासाचा नाही, २ तासातील अर्ध्या तासाचा आहे. म्हणजे एकूण प्रवासातील सुमारे २५% वेळ वाचणार.. पण त्यासाठी ₹६,६९५ कोटी खर्च आवश्यक आहे?
आहे! सांगतो कसे..
१. पहिला मुद्दा : “Man Hours”
या रस्त्यावरून रोज १.५ लाख गाड्या प्रवास करतात. ‘Human Resource Collective Time’ ही संकल्पना ज्यांना माहीत आहे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल.
१.५ लाख गाड्यांमध्ये एकच व्यक्ती असेल असेच गृहीत धरले, म्हणजे सार्वजनिक वाहतुकीने जाणारे एकत्रित प्रवासी, बसेस जरी सोडल्या
तरी,
१.५ लाख X ०.५ तास = ७५००० तास
नागरिकांचे एकत्रित किमान ७५००० तास वाचतात.
७५,००० man-hours म्हणजे:
* एका व्यक्तीचे सलग ८.५ वर्षे काम करण्याइतका वेळ किंवा,
* ९,३७५ लोकांचे एका दिवसाचे ८ तासांचे काम किंवा,
दररोज जवळपास ₹१५–२० कोटींची उत्पादकता क्षमता!!!!
(सरासरी व्यावसायिक वेळेच्या आर्थिक मूल्यानुसार)
तात्पर्य: रोज किमान १५ ते २० कोटींची उत्पादन क्षमता यामुळे निर्माण होते.
—-
२. दुसरा मुद्दा : थेट इंधन बचत
खंडाळा घाटातील नागमोडी आणि गर्दीने भरलेला मार्ग टाळला जातो. परिणामी, अंतर सुमारे ६ किमी कमी होते.
लहान मोठ्या सर्व गाड्यांचे average काढले तर
* दैनिक किमान इंधन बचत: ~१.५ लाख लिटर
* दैनिक किमान आर्थिक बचत: ~₹१.५७ कोटी
म्हणजे वर्षभरात किमान ५५० कोटींचे इंधन वाचते.
—-
३. तिसरा मुद्दा : पर्यावरण संवर्धन
या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचा पर्यावरणीय प्रभाव:
* दैनिक CO₂ बचत: ~३८२.५ मेट्रिक टन
* वार्षिक CO₂ बचत: ~१.४ लाख मेट्रिक टन
म्हणजे सुमारे ६४ लाख वृक्षांनी वर्षभरात शोषलेल्या कार्बन इतकी बचत यामुळे होत आहे. कार्बन क्रेडिट संकल्पना माहीत असलेल्यांसाठी सांगतो, यामुळे किमान ११.६ कोटींपेक्षा अधिक कार्बन क्रेडिट मूल्य निर्माण होऊ शकते.
वाहनांची सततची ब्रेकिंग-एक्सेलरेशन सायकल कमी झाल्यामुळे इंजिनवरील ताण कमी होतो आणि प्रदूषणात घट होते. म्हणजेच, हा प्रकल्प केवळ ‘फास्ट ट्रॅक’ नाही, तर ‘ग्रीन ट्रॅक’ देखील आहे.
४. मुद्दा चौथा: सुरक्षिततेत वाढ
खंडाळा घाटाचा इतिहास अपघातांनी भरलेला आहे. ब्रेक फेल होणे, नागमोडी वळणांवर नियंत्रण सुटणे, अवजड वाहनांचे अपघात हे सगळे आता मोठ्या प्रमाणात कमी होतील. Access Controlled Design आणि आधुनिक सुरक्षा प्रणालीमुळे वाहतूक अधिक शिस्तबद्ध झाली असून संभाव्य अपघातांमध्ये तब्बल ९०% पर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जीव वाचवणे यापेक्षा मोठा फायदा कोणता असू शकतो? जीवन तर अमूल्य आहे!
———
असे अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे या मार्गाचा थेट फायदा अधिरेखित होऊ शकतो. तूर्तास एवढेच..
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर
..कुठलंही शहर स्वच्छ सुंदर असावं यासाठी विकासाबरोबर ते शहर आपलं आहे, ही भावना नागरिकांच्या मनात असावी लागते.. त्या शहराच्या स्वच्छतेसाठी परिसराला जपण्यासाठी पुढाकार सर्वांनी घ्यावा लागतो, त्यासाठी वेळ द्यावा लागतो.. तरच ते शहर खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते!
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षांपासून सुरू असलेले स्वच्छता अभियान आज अशाच सामाजिक जाणीवेची एक प्रेरणादायी लोकचळवळ बनले आहे. सलग ४०० हून अधिक आठवडे अविरत सुरू असलेला हा उपक्रम म्हणजे सातत्य, शिस्त आणि शहराप्रती असलेल्या आपुलकीचा सुंदर प्रवास आहे.
या अभियानाची सुरुवात एका साध्या पण महत्त्वाच्या विचारातून झाली, ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना “हे शहर आपलं आहे” ही भावना निर्माण व्हावी. महापुरुषांचे विचार, सामाजिक कृतज्ञता आणि स्वच्छतेची सवय यांची सांगड घालत या उपक्रमाची बीजे रोवली गेली. आज या मोहिमेत विद्यार्थी, उद्योजक, डॉक्टर, वकील, निवृत्त अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
दर रविवारी सकाळी शहरातील चौक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय परिसर स्वच्छ करण्यासाठी अनेक हात एकत्र येतात. विशेष म्हणजे, या उपक्रमात अधिकारी आणि कर्मचारीही स्वतः हातात झाडू घेऊन सहभागी होतात. कारण जिथे आपण काम करतो, तो परिसर स्वच्छ आणि सकारात्मक असेल, तर काम करण्याची ऊर्जाही वाढते.
या चळवळीशी माझाही भावनिक संबंध अनेक वर्षांपासून जोडलेला आहे. पुणे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असतानाही शक्य तितक्या वेळा वीकेंडला छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन सकाळी या अभियानात सहभागी होत होतो. कारण स्वच्छता ही केवळ मोहीम नाही.. ती समाजाशी असलेली बांधिलकी आहे.
स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनालाही या अभियानातून विशेष महत्त्व दिले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यालगत ‘थ्री-टियर प्लांटेशन’ संकल्पना राबवून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात आहे. यामुळे वायू प्रदूषण आणि धूळ कमी होण्यास मदत होत आहे. प्रवाशांना सावली, गारवा मिळत आहे. मृदा धूप आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत.
या लोकचळवळीची खरी ताकद म्हणजे यातून मिळणारे समाधान, समाजासाठी काहीतरी चांगलं केल्याची भावना आणि पुढच्या पिढीमध्ये सामाजिक जबाबदारीची रुजणारी बीजे..
देवगिरी उदयान ग्रुप, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही चळवळ आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या शहरासाठी, आपल्या पर्यावरणासाठी आणि पुढच्या पिढीसाठी आपणही या स्वच्छता अभियानाचा भाग बनूया..
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर
व्हिडियो सिरीज भाग २ | “पदाचा सन्मान आणि प्रशासकीय कर्तव्यांची जाण…”
राजकारण आणि प्रशासन या दोन वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करताना नियम, शिस्त आणि पदाची प्रतिष्ठा जपणे महत्त्वाचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत असताना कोणत्याही राजकीय बॅनर, पोस्टर किंवा फ्लेक्सवर स्वतःचा फोटो वापरला जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली आणि त्याचा सकारात्मक परिणाम झाला. विशेष म्हणजे, या भूमिकेचा पूर्ण सन्मान राखत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या.
अनेकदा नातेसंबंध आणि पद यांची सरमिसळ होताना दिसते. मात्र, नियमांना प्राधान्य देत प्रशासनाची विश्वासार्हता आणि लोकशाही मूल्ये जपण्याची ही भूमिका अनेकांसाठी मार्गदर्शक असावी, असा उद्देश आहे.
या निर्णयाची विविध स्तरांतून सकारात्मक दखल घेतली जात असून, पालकमंत्री ना.श्री.संजयजी शिरसाट यांनीही या भूमिकेचे कौतुक केले आहे.
ही घटना केवळ एका फ्लेक्सपुरती मर्यादित नसून, पदाचा मान, नियमांचा आदर आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.
केरळच्या किनाऱ्यावरील वाळूपासून आता पुढील ५०० वर्षे भारत देश चालेल एवढी ऊर्जा निर्माण करणार आहोत!
ना पेट्रोल ना डिझेल ना गॅस आयात करण्याची गरज उरणार.. इंधनावर होणारा प्रचंड खर्चही देशाबाहेर जाणार नाही.. स्वप्नवत वाटत असलं तरी हे वास्तवाच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल आहे.. कारण भारताने थोरियम रिऍक्टर संशोधनात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे!
आपल्याकडे निर्माण होणारी ऊर्जा अजूनही परदेशातून आयात केला जाणाऱ्या कोळसा, तेल आणि गॅसवर अवलंबून आहे. या आयातीत देशाचा हजारो कोटींचा पैसा दरवर्षी खर्च होतो. यावर दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर थोरियम हा यावर एक शाश्वत उपाय ठरू शकतो..
आज मोबाईल पासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक गोष्ट चालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. थोरियमच्या माध्यमातून स्वच्छ सातत्यपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा निर्माण करता येते. राष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचे हे एक उत्तम माध्यम ठरेल..
थोरियम हे एक असं खनिज आहे ज्यातून खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार करता येते. विशेष म्हणजे यात ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत वापरलेल्या इंधनापेक्षा अधिक इंधन तयार होण्याची क्षमता असते. त्यामुळे हा एक दीर्घकालीन ऊर्जास्रोत ठरतो..
भारताकडे थोरियमचे प्रचंड साठे उपलब्ध आहेत. विशेषतः केरळच्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मोनाझाइट वाळूमध्ये थोरियम आढळते. ही आपल्या देशासाठी निसर्गाची मोठी देणगी आहे. तज्ज्ञांच्या मते भारताकडे इतका थोरियम साठा आहे की तो पुढील सुमारे ५०० वर्षे देशाची ऊर्जा गरज भागवू शकतो..
पारंपरिक अणुऊर्जेच्या तुलनेत यामध्ये निर्माण होणारा किरणोत्सारी कचरा कमी असतो आणि तो कमी धोकादायक असतो. तसेच यात अपघाताचा धोका अत्यल्प असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही थोरियम रिऍक्टर अधिक विश्वासार्ह मानले जातात..
आज बदलत्या वातावरणामुळे आणि पर्यावरणासमोरील प्रदूषणासारखे धोके लक्षात घेता जगभरात स्वच्छ ऊर्जेला प्राधान्य दिले जात आहे. वातावरणातील वाढता कार्बन उत्सर्जन कमी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. थोरियममधून निर्माण होणारी ऊर्जा ही कार्बनमुक्त असल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी हा एक अत्यंत प्रभावी पर्याय ठरतो..
थोरियमवर आधारित तंत्रज्ञान अजून पूर्णपणे व्यावसायिक पातळीवर येण्यासाठी किमान ३० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. पण एकदा ही प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर ती अक्षय ऊर्जेसारखी सातत्याने ऊर्जा देणारी ठरू शकते.. भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल एवढी क्षमता यात निश्चितच आहे.
ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात करण्यासाठी लागणारा खर्च हा आजच हजारो कोटींच्या घरात आहे. २०५० पर्यंत हा खर्च आणखी कितीतरी पटींनी वाढेल. परंतु आपण जर आपण थोरियमसारख्या स्वदेशी ऊर्जेवर भर दिला तर हा पैसा देशाबाहेर जाणार नाही. उलट तोच पैसा देशाच्या विकासासाठी शिक्षण पायाभूत सुविधा आणि उद्योगांसाठी वापरता येईल..
डॉ.होमी भाभा यांनी मांडलेला त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम हा याच विचारातून तयार झाला होता. त्या माध्यमातून भारत थोरियम आधारित ऊर्जेकडे टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे..
थोरियमच्या क्षेत्रात संशोधनाचे महत्त्वाचे टप्पे आज भारताने गाठले आहेत. त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रमाच्या आधारे भारताने फास्ट ब्रीडर रिऍक्टर विकसित केले आहेत. कल्पक्कम येथे प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिऍक्टर उभारला गेला आहे. तसेच थोरियमवर चालणाऱ्या Advanced Heavy Water Reactor चे डिझाइनही तयार करण्यात आले आहे. याशिवाय थोरियमपासून युरेनियम-२३३ निर्माण करण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत..
संशोधक, राजकीय नेतृत्व आणि विषयातील तज्ञांनी एकत्र येऊन राष्ट्राच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेचा विचार करायचा ठरल्यास या क्षेत्रात भारताचा हात जगात कोणीही धरू शकणार नाही.. म्हणूनच थोरियम हा शाश्वत ऊर्जा निर्मितीचा हा एक उत्तम पर्याय ठरेल हा विश्वास वाटतो!
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर
पंतप्रधान @narendramodi जी यांनी आणलेले 'नारी शक्ती वंदन अधिनियम' खऱ्या अर्थाने महिला-प्रणित विकासाच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.
ही केवळ एक सुधारणा नसून हे एक परिवर्तन आहे.
#NariShaktiVandan#नारीशक्तीवंदन
"..पाण्याच्या थेंबातून विकास आणि प्रगती जन्म घेत असते. हे पाणी कुठल्या एका राज्याच्या मालकीचे नसून ती राष्ट्रीय संपत्ती आहे.." असा विचार मांडणारे द्रष्टे महामानव म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर!
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त पिपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) अंतर्गत नागसेनवन परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होऊन विचार मांडण्याची संधी मिळाली.
“The Architect of Modernity: Dr.B.R.Ambedkar and Transformation of India’s Water Resources” या विषयाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा त्यांच्या प्रगाढ विचारांची खोली आपल्याला निश्चित लक्षात येते..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील पाणी व्यवस्थापनाची संकल्पना केवळ सिंचनापुरती मर्यादित न ठेवता तिला विकासाशी जोडले. त्यांनी धरणांद्वारे सिंचन, पूर नियंत्रण आणि वीज निर्मिती अशा बहुउद्देशीय प्रकल्पांची संकल्पना मांडली, ज्यामुळे देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली.
त्यांनी १९४५ मध्ये केंद्रीय जलमार्ग, सिंचन आणि नौवहन आयोग स्थापन करून भारतातील नद्यांच्या अभ्यास, नियोजन आणि संशोधनाला वैज्ञानिक दिशा दिली. तसेच दामोदर खोरे विकास महामंडळासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून पूर नियंत्रण आणि विकास यांचा समतोल साधला.
सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी पाणी हे राज्यापुरते मर्यादित न ठेवता ते राष्ट्रीय संपत्ती आहे ही भूमिका मांडली. पाण्याशी संबंधित निर्णय हे वैज्ञानिक आधारावर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतले जावेत, असा त्यांचा ठाम आग्रह होता.
आज भारतातील जलसंपदा व्यवस्थापनाची पायाभरणी ज्या विचारांवर उभी आहे, ती दिशा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. त्यांचे कार्य आजही देशाच्या विकासाला प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक ठरते..
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर.
..एका बाजूला अत्यंत सुशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित पदस्थ अधिकारी आणि दुसरीकडे फाटके कपडे घातलेला गरीब घरातील एक अशिक्षित मुलगा पण माणुसकीच्या बाबतीत मात्र त्या मुलाने अधिकाऱ्यावरही मात केली!!
ज्ञान, पद आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकी किती मोठी असते.. जीवनातील अनेक प्रसंग याची जाणीव करून देत असतात फक्त त्याकडे सकारात्मक भूमिकेतून पाहिले पाहिजे..
असाच एक प्रसंग देशातील अत्यंत उच्च पदावर कार्य केलेल्या अधिकाऱ्याच्या संदर्भात सांगितला जातो. एकदा ते आपल्या पत्नीसोबत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असताना, रस्त्याच्या कडेला एका झाडावर बया पक्ष्याचे सुंदर घरटे दिसले. त्यांच्या पत्नीने सहज इच्छा व्यक्त केली की ते घरटे आणून द्यावे, जे घर सजावटीसाठी उपयोगी पडेल.
त्यांनी सोबत असलेल्या सुरक्षारक्षकाला ते घरटे उतरवण्यास सांगितले. सुरक्षारक्षकाने जवळच मेंढ्या-बकऱ्या चारणाऱ्या एका लहान मुलाला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवत ते घरटे काढण्यास सांगितले. मात्र त्या मुलाने यासाठी स्पष्ट नकार दिला. यानंतर अधिक पैसे देण्याची तयारी दाखवूनही मुलगा आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्याचे साधे पण मनाला भिडणारे उत्तर होते, त्या घरट्यात पक्ष्याची पिल्लं आहेत आणि संध्याकाळी त्यांची आई परत आल्यावर तिला तिचं घर रिकामं दिसेल, हे त्याला मान्य नव्हतं. या छोट्याशा प्रसंगाने एक मोठा संदेश दिला.
एका अशिक्षित मुलामध्ये असलेली संवेदनशीलता आणि माणुसकी, हीच त्या क्षणी सर्वात मोठी ठरली. पुढे या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी स्वतः कबूल केल्याचे सांगितले जाते की, उच्च शिक्षण, मोठे पद आणि प्रतिष्ठा असूनही त्या क्षणी खरी माणुसकी त्या मुलाकडे होती.
या प्रसंगातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्टपणे समोर येतो, शिक्षण, पद आणि पैसा हे जीवनात आवश्यक असले तरी त्यासोबत संवेदनशीलता आणि माणुसकी असणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा या सर्व गोष्टी अपूर्ण राहतात.
आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात आपण यशाच्या मागे धावत असताना, आपल्या विचारांमध्ये आणि कृतीत माणुसकी जपणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी, मोठं होणं आणि खऱ्या अर्थाने माणूस होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर.
सायकल मुळे मी शासकीय अधिकारी..
होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटप केले त्यामागची भूमिका पण तीच!
माझ्या लहानपणी शाळेत जाण्यासाठी अनेक किलोमीटरचे अंतर पायी पार करावं लागायचं.. त्या प्रवासात वेळ खूप जायचा आणि थकवाही जाणवायचा.. अर्थात तेंव्हा शाळेची ओढ एवढी असायची की त्यात त्रास वाटत नव्हता.
पण थोडा मोठा झालो तसा अभ्यास पण वाढला. घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या.. पण त्यासोबत एक गोष्ट मिळाली.. सायकल!
सायकल मिळाली, तेव्हा आयुष्यच जणू बदललं..
सायकलमुळे वेळेची मोठी बचत होऊ लागली.. पूर्वी जे अंतर पार करण्यासाठी खूप वेळ लागत असे, तेच अंतर आता कमी वेळात पूर्ण होऊ लागलं.. चालून शाळेत जाण्याचा वेळ वाचला. पण वाचलेल्या वेळेचे करायचे काय? तर अभ्यास!
सायकलमुळे वाचलेल्या वेळेची “इन्वेस्टमेंट” अभ्यासात करायचे ठरवले आणि आयुष्य बदलून गेले असे मला आजही वाटते.
सायकल हे साधन आहे. ते ट्रान्सपोर्टेशनचे साधन कमी आणि वेळ वाचवण्याचे साधन जास्त आहे असे मला वाटते. आयुष्यात अनेक साधने आपण वापरत असतो.. पण त्याची खरी उपयोगिता तेंव्हाच जेंव्हा त्या साधनांमुळे वाचलेला वेळ आपण आपल्या ध्येयासाठी उपयोगात आणू..
विद्यार्थिनींनी सायकलकडे वेळेची बचत करून देणारं आणि जीवन घडवणारं साधन म्हणून पाहायला हवं.. कारण सायकलमुळे वाचलेला प्रत्येक क्षण हा आपल्या प्रगतीसाठी वापरता येऊ शकतो..
आज-काल काही ठिकाणी बस, जीप किंवा ऑटो यांसारख्या सुविधा उपलब्ध असतीलही.. पण सायकल ही आपल्या हक्काचं साधन आहे.. केव्हाही, कुठूनही आपल्या सोयीनुसार निघता येतं आणि वेळेचं बंधन राहत नाही..
सायकल वाटप या उपक्रमातून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील होतकरू मुलींना सायकल देताना विशेष समाधान वाटलं.. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना एकच विचार मनात आला.. या सायकली त्यांच्या आयुष्यातही वेळेची बचत करून, शिक्षणासाठी नवी संधी निर्माण करतील..
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - जालना टोलवेज लिमिटेड यांचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजेत.. कारण अशा संस्था शिक्षणासारख्या पवित्र कार्याला हातभार लावतात आणि त्यातूनच उद्याची पिढी घडते..
शिक्षणासाठीची जिद्द आणि वेळेचं महत्त्व ओळखून जर प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केले, तर कोणतीही अडचण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही..
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर.
फुलंब्री येथे रमजान ईदच्या पावन निमित्ताने मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या..
रमजान ईद, ज्याला ‘ईद-उल-फित्र’ असेही म्हणतात, हा इस्लाम धर्मातील महत्त्वाचा सण.. संपूर्ण रमजान महिन्यात उपवास (रोजा) पाळल्यानंतर हा सण साजरा केला जातो.. इस्लामिक दिनदर्शिका चंद्रावर आधारित असल्यामुळे ईदचा दिवस ‘चांद दिसणे’ या खगोलशास्त्रीय घटनेवर ठरतो.. त्यामुळे यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही दिसून येतो. उपवासाच्या काळात शरीरातील विषारी घटक कमी होऊन शरीरशुद्धी (detoxification) होते, तसेच आत्मसंयम आणि मानसिक शांती वाढते..
पैगंबर हजरत मोहम्मद यांनी बद्रच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर प्रथमच ईद साजरी केल्याचे मानले जाते.. त्यामुळे हा सण आनंदाबरोबरच त्याग, संयम आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा आहे.. या दिवशी ‘जकात-उल-फित्र’ द्वारे गरजू आणि गरिबांना मदत केली जाते, ज्यातून समाजातील समानता आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ होते..
ही ईद सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, तसेच समाजात एकोप्याची भावना अधिक बळकट होवो, हीच सदिच्छा..
माझ्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी केलेल्या आवाहनाला आपण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला..
अनेकांनी या समाजोपयोगी कार्यात योगदान दिले व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला..
या सर्व सकारात्मक प्रतिसादामुळे समाजात शिक्षणाविषयीची जाणीव आणि संवेदनशीलता दृढ होत आहे, याचा आनंद वाटतोय..
आपल्या सर्वांच्या या विश्वासाबद्दल आणि सहकार्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.. आपले योगदान नक्कीच अनेक मुलांच्या भविष्यास नवी दिशा देणारे ठरेल, असा मला विश्वास आहे.
-अतुल चव्हाण
सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर.
आपले मनःपूर्वक धन्यवाद!
आपल्यासारख्या हितचिंतकांची साथ, माझ्यावरील विश्वास आणि जिव्हाळा हा कार्याची ऊर्जा वृद्धिंगत करणारा आहे..
या सकारात्मक कार्यात आपणही सहभाग घेतला त्याबद्दल आपले विशेष आभार!
#धन्यवाद#Thanks
https://t.co/RWNUvW8JZo
वाढदिवसानिमित्त श्री बालाजींच्या चरणी कृतज्ञ प्रार्थना…
वाढदिवसा निमित्त तिरुपती येथे भगवान श्री बालाजींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. प्रभूच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे प्रार्थना केली. हाती घेतलेले कार्य यशस्वीरीत्या पार पडू दे आणि समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्याची शक्ती मिळू दे..
लाखो भाविकांच्या अढळ श्रद्धेने पावन झालेल्या तिरुपतीच्या या पवित्र भूमीत दर्शन घेताना मनाला वेगळीच शांती व समाधान लाभले.
आजच्या या दिवशी मिळालेल्या आशीर्वादातून पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा, प्रेरणा आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली.
भगवान श्री बालाजींची कृपा सदैव सर्वांवर राहो, हीच प्रार्थना.
.. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योगदानासाठी स्वतःपासून सुरुवात!!
असं म्हणतात की कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून करावी.. काही नवीन चांगला विचार आला की मी नेहमी स्वतःपासून त्याची सुरुवात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.. आदर्शगाव योजनेत काम करताना श्रमदान असो किंवा सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेचे काम असो, मी नेहमीच स्वतः पुढाकार घेतला. त्यानंतर माझे सर्व सहकारीही उत्साहाने सहभागी झाले..
आजही त्याच भावनेतून ‘आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिल्हा परिषद शाळा विकसन प्रकल्पा’साठी योगदान देण्याची जबाबदारी मी स्वतःपासूनच सुरू करत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उभारल्या जाणाऱ्या या उपक्रमाला माझ्या वाढदिवसानिमित्त ₹९९,९९९/- इतकी मदत देत आहे. या योगदानात आणखी वाढ करण्याचाही मानस आहे..
विद्यार्थ्यांसाठी उभा राहिलेला हा उपक्रम अधिक व्यापक आणि प्रभावी व्हावा यासाठी आपण सर्वांनीही या प्रकल्पात सहकार्य करावे ही नम्र विनंती.
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर.
गेल्या वर्षी वाढदिवसानिमित्त एक छोटासा पण मनापासूनचा संकल्प केला : आपला आनंद गरजू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगी पडावा.
त्यासाठी वाढदिवसाचा होणारा खर्च बाजूला ठेवून तो निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी देण्याचा निर्णय घेतला.
या निमित्ताने सर्व मित्रपरिवार, सहकारी आणि शुभेच्छुकांना पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करावी ही नम्र विनंती केली होती..
या आवाहनाला सर्वांनी मनापासून प्रतिसाद देत सहकार्य केले. त्या माध्यमातून जमा झालेला संपूर्ण निधी फुलंब्री येथील श्री संत सावता गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी देण्यात आला.
या निधीतून सुमारे २५ लाख रुपयांचे २९ संगणक, १ इंटरॅक्टिव्ह बोर्ड तसेच संगणक टेबल आणि इतर आवश्यक साहित्य विद्यालयाला उपलब्ध करून देता आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या डोळ्यांत दिसलेली नवी स्वप्ने हेच या उपक्रमाचे खरे समाधान ठरले.
यावर्षीही वाढदिवसानिमित्त सर्वांना नम्र विनंती आहे की पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देण्याऐवजी माझ्या जीवनाचे परमोच्च ध्येय असलेल्या “आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिल्हा परिषद शाळा विकास प्रकल्पासाठी” यथाशक्ती सहकार्य करावे.
आपली छोटीशी मदत एखाद्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देईल आणि कदाचित उद्याचा डॉक्टर, अभियंता, अधिकारी किंवा समाजासाठी काम करणारा जबाबदार नागरिक घडवेल.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
– अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर
वाढदिवसानिमित्त विनम्र आवाहन!
१५ मार्च रोजी माझा वाढदिवस मी गरजू विद्यार्थ्यांना समर्पित करीत असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपणही छोटासा पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती आहे..
..अंगावर शहारे आणणारी ललकारी.. जय भवानी, जय शिवाजी!!
जाती-धर्म पंथ यांच्या पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करून प्रत्येकाला आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी छत्रपती शिवरायांनी आपले सर्वस्व वेचले..
महाराजांचे कर्तृत्व हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे.. शीख धर्मातील हा छोटा मुलगा ज्या आदराने आणि अभिमानाने महाराजांच्या नावाची ललकारी देतो आहे, ते पाहून अभिमान वाटतो!!
#छत्रपती_शिवाजी_महाराज #Chhatrapati_Shivaji_Maharaj
एक साधा, फाटका आणि मळकट शर्ट घातलेला बाप आपल्या १५ वर्षांच्या लेकीला घेऊन शहरातील एका महागड्या हॉटेलमध्ये गेला. वेटरने नेहमीप्रमाणे विचारले, “काय आणू?”..
बापाने हळूच उत्तर दिलं, “माझी मुलगी दहावीमध्ये जिल्ह्यात पहिली आली आहे… तिला डोसा खाऊ घालायचा आहे.” त्याने स्वतःसाठी काहीही मागवलं नाही. कारण त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते.. वेटरला ही गोष्ट समजली, त्याने मालकाला सर्व सांगितले. मालकाने क्षणाचाही विचार न करता सांगितले, “आजचा सगळा खर्च हॉटेल कडून!”
त्या दिवशी टेबल खास सजवले गेले, मुलीला तिच्या आवडीचे जेवण दिले गेले.. त्या छोट्याशा क्षणाने तिच्या मनात एक विश्वास निर्माण झाला. जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे.
काही वर्षांनी तीच मुलगी मेहनतीच्या जोरावर मोठी झाली. अभ्यास, जिद्द आणि वडिलांच्या त्यागाच्या बळावर ती आयएएस अधिकारी बनली आणि जिल्हाधिकारी म्हणून त्याच शहरात रुजू झाली.. आपल्या वडिलांना ती घेऊन पुन्हा त्याच हॉटेलमध्ये आली. सर्वांसमोर नम्रपणे उभी राहून ती म्हणाली, “मी तीच मुलगी, जिच्यासाठी तुम्ही त्या दिवशी सन्मानाने जेवण दिलं होतं.. माझ्या यशात माझ्या वडिलांसोबत तुमचाही वाटा आहे.”
त्या दिवशी तिने त्या हॉटेलचा पूर्ण खर्च स्वतः उचलला आणि हॉटेलचे मालक व वेटर यांचा “Best Citizen” म्हणून सन्मान केला..
समाज म्हणून आपण एखाद्याच्या स्वप्नांना थोडासा आधार दिला, कुणाच्यातरी छोटासा आनंदात सहभागी झालो, तर कदाचित त्या स्वप्नातून उद्या किती मोठे भवितव्य घडेल हे आपण सांगू शकत नाही.. माणुसकी, शिक्षण आणि कष्ट यांची ही सांगडच समाजाला पुढे नेणारी खरी ताकद आहे.. आणि माणुसकीची जाण ठेवणारे असे काही लोक विरळेच..
-अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला होता. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती स्वराज्याच्या उभारणीसाठीच समर्पित होती.
प्रतिकूल परिस्थिती, बलाढ्य शत्रू आणि मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी धैर्य, दूरदृष्टी आणि सुयोग्य नियोजनाच्या बळावर स्वराज्य साकार केले. त्यांच्या संघर्षामुळेच आज आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो आणि आपले अस्तित्व अभिमानाने जपू शकतो.
महाराजांनी केवळ शौर्यानेच नव्हे तर विचारांची ताकद, संघटन कौशल्य आणि अचूक निर्णयक्षमतेच्या आधारे इतिहास घडवला. त्यांचे नेतृत्व हे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
हे विचार योग्य प्रकारे आणि योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचले तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या युवा पिढीवर निश्चितच होईल. युवकांची विचारदिशा स्पष्ट झाली तर समाज अधिक सक्षम, सजग आणि प्रगत होईल..
– अतुल चव्हाण
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर..