‘ब्रोमो-४ मिथाईल प्रोपिओ फेनॉल’वर निर्बंध; ड्रग्जविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील अमली पदार्थांच्या अवैध निर्मितीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ब्रोमो-४ मिथाईल प्रोपिओ फेनॉल’ या रसायनाचा नियंत्रित पदार्थांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे. तसेच, ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानांतर्गत चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात असून, अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचे धोरणही राज्य सरकारने जाहीर केले आहे.
#DrugFreeMaharashtra #DevendraFadnavis #Mumbai #AntiDrugs #BreakingNews
30 वर्षे सत्तेत होतात, रुग्णालयासाठी काय केलं?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. “गेली ३० वर्षे शहरात सत्ता असलेल्यांनी रुग्णालयासाठी नेमके काय केले?” असा सवाल करत त्यांनी माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरही टीका केली. “सहा दिवस पाऊस होता, आज रवी दिसला; पण आमच्या डोंबिवलीचा ‘रवी’ कुठेच दिसला नाही,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “केडीएमसीमध्ये आम्ही अवघे सहा महिन्यांपासून सत्तेत आहोत. आम्हाला पाच वर्षे काम करू द्या, त्यानंतर आमचा जाब विचारा,” असेही राजू पाटील म्हणाले.
@rajupatilmanase@RaviDadaChavan
#RajuPatil #MNS #Dombivli #KDMC #ravindrachavan
“मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन…” राज ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार!
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. “मी हिंदीत एक वाक्य ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, पण मिरची दुसऱ्यालाच लागली,” असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख “मिमिक्री आर्टिस्ट”, “स्टँडअप कॉमेडियन” अशा शब्दांत केला. मात्र, “ते आमचे चांगले मित्र आहेत आणि राजकारणात त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही,” असे म्हणत त्यांनी टोलेबाजीसोबत मैत्रीचाही उल्लेख केला.
#DevendraFadnavis #RajThackeray #MNS #MaharashtraPolitics #MarathiNews
अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात; १४ वाहनांचा चुराडा, ३ जण जखमी
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बसने नियंत्रण गमावल्याने तब्बल १४ वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
#Andheri #BESTBus #MumbaiAccident #MumbaiTraffic #BreakingNews
राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका; मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करत साधला निशाणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील सावरकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरड कोसळण्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी फडणवीसांची मिमिक्री केली आणि “प्रश्न विचारला की त्याला राजकारण म्हणता. दुसऱ्यांचे सरकार असताना आंदोलने केली, तेव्हा ते राजकारण नव्हते का?” असा सवाल उपस्थित केला. “लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, महाराष्ट्राचा अपमान करत नाहीत. केंद्र सरकारवर टीका केली की देशद्रोही ठरवण्याची सवय लागली आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
#RajThackeray #DevendraFadnavis #MNS #MaharashtraPolitics #BreakingNews #MissingLink #MumbaiPune
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; मनसे नेते राजू पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणावर मनसे नेते राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “२४ तासांनंतर गुन्हा दाखल झाला, त्यात माध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. डॉक्टरांवर हात उचलणे चुकीचे आहे,” असे त्यांनी म्हटले.
रुग्णांना सुविधा कमी पडत असतील तर त्यासाठी जबाबदार कोण, असा सवाल करत त्यांनी, “महापालिकेवर ३० वर्षे सत्ता असताना रुग्णालयाला काय दिले?” असा प्रश्नही उपस्थित केला. रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांसाठी डॉक्टरांना दोषी धरणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
#RajuPatil #kdmc #Dombivli #DoctorAssault #KalyanNews
प्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’ पार्लरवर FDAची कारवाई; परवाना निलंबित
मुंबईतील चर्चगेटजवळील ब्रेबॉर्न स्टेडियम इमारतीतील प्रसिद्ध **‘रुस्तम आईस्क्रीम पार्लर’**वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. तपासणीत मोठ्या प्रमाणात मुदत संपलेले कृत्रिम फ्लेवरिंग एजंट्स आणि एसेन्स आढळून आल्याने पार्लरचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला असून, अन्नपदार्थांच्या नमुन्यांचे अहवाल येईपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान पिस्ता, पाइनॲपल, स्वीट ऑरेंज, चेरी, बदाम, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट, लेमन, मिक्स फ्रूट, रम जमैका आदी मुदतबाह्य फ्लेवर्स अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे अन्नसुरक्षेबाबत FDAने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
#FDA #RustomIceCream #Mumbai #FoodSafety #BreakingNews
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, इतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाईची मागणी विविध स्तरांतून करण्यात येत होती.
@AmhiDombivlikar@DombivliNews
#Dombivli #DoctorAssault #RameshMhatre #ShivSena #BreakingNews
‘राष्ट्रवादी NDAत जाणार नाही’; संजय राऊतांचा दावा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील पक्षफोडीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला. “आमचे सहा खासदार पैशांच्या जोरावर शिंदे गटाने फोडले. रोज आमदार आणि पक्ष फुटणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. मात्र, मातोश्रीवरील बैठकीला आमचे सर्व आमदार उपस्थित होते,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, “शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार किंवा त्यात विलीन होणार, अशी शक्यता अजिबात नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि देशात इंडिया आघाडीचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे,” असा दावाही संजय राऊत यांनी केला.
#SanjayRaut #SharadPawar #MVA #INDIAAlliance #MaharashtraPolitics
भांडुपमध्ये ‘बेस्ट’ बसची पादचाऱ्याला धडक; ४३ वर्षीय व्यक्ती जखमी
मुंबईतील भांडुप पश्चिम येथील कोकण नगर परिसरात बुधवारी सकाळी ‘बेस्ट’ बसची धडक बसल्याने ४३ वर्षीय पादचारी जखमी झाला. ‘बेस्ट’ नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास ओशिवरा डेपोतून A-425/32 मार्गावर धावणारी बस (क्रमांक 4047) या अपघातात सहभागी होती. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#BESTBus #Mumbai #Bhandup #RoadAccident #BreakingNews
डॉक्टरांवरील हल्ला निषेधार्ह; दोषींवर कठोर कारवाई होणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या घटनेचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची सेवा आहे. डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल व तणावपूर्ण परिस्थितीतही दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
@AmhiDombivlikar@DombivliNews
#ShrikantShinde #KDMC #DoctorAssault #Dombivli #BreakingNews #Dombivli
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंची दिलगिरी, महिला डॉक्टरला मारहाण केल्याचा आरोप फेटाळला
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टरला झालेल्या कथित मारहाण प्रकरणानंतर माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “घडलेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही,” असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
#Dombivli #RameshMhatre #DoctorAssault #shivsena #kdmc #MarathiNews #MumbaiManthan
बेकायदा बाईक टॅक्सीबाबत सरकारची मोठी घोषणा; प्रताप सरनाईकांची विधानसभेत माहिती
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत बाईक टॅक्सी धोरणाबाबत महत्त्वाची घोषणा केली. नव्या धोरणानुसार प्रत्येक बाईक टॅक्सीकडून सरकारला दररोज ५ रुपये शुल्क मिळणार असून, प्रत्येक राईडच्या भाड्यातील २ टक्के रक्कमही सरकारकडे जमा होणार आहे.
याशिवाय, महाराष्ट्रातील डोमिसाईल असलेल्या तरुणांनाच बाईक टॅक्सी चालविण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा सरकारचा दावा आहे.
#PratapSarnaik #BikeTaxi #Maharashtra #Transport #BreakingNews #uber #ola #rapido
डॉक्टर मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सवर झालेल्या मारहाण प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “गृहमंत्री पदाची पूजा घाला! कोरोनाकाळात जनतेची सेवा करणाऱ्या महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण केली जाते, हे काय कायद्याचे राज्य आहे?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “या प्रकरणातील सर्व आरोपींच्या हातात बेड्या घालून त्यांची चड्डी-बनियनवर वरात काढा,” अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.
#SanjayRaut #DevendraFadnavis #kdmc #MarathiNews #kalyandombivali #MaharashtraPolitics #marathinews #MumbaiManthan
कल्याण स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांवर ‘मोकोका’ अंतर्गत कारवाई
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या टोळीचे संचालन करणाऱ्या ६ महिलांविरोधात थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमधून तब्बल २० महिलांना वेश्या व्यवसायात ढकलून त्यांच्याकडून आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील आणखी ३ पुरुष आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कल्याण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे स्टेशन परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
#Kalyan #MCOCA #CrimeNews #KalyanPolice #BreakingNews #kalyancrime #kalyandombivli
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा!
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्राच्या परवान्याच्या आड सुरू असलेल्या अश्लील डान्सबार संस्कृतीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने डान्सबार विरोधी कायद्यात सुधारणा करणारे महत्त्वाचे विधेयक विधानसभेत सादर केले आहे. कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेत ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर या विधेयकाद्वारे कठोर नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
नव्या कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार चालकांवर अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होणार असून, अश्लील डान्सबारच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#Maharashtra #DanceBar #OrchestraBar #Assembly #breakingnews
‘अदानीला पाच लाख कोटींच्या जमिनी कवडीमोल दरात’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप
विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सरकारी जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. अदानी समूहाला राज्यातील सुमारे पाच लाख कोटी रुपयांच्या किमतीच्या जमिनी कवडीमोल दरात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सी-लिंक प्रकल्पालगतच्या भूखंडासाठी पहिल्या निविदाकाराने साडेअकरा हजार कोटी रुपयांची बोली लावली असताना, तोच भूखंड अदानींना साडेआठ हजार कोटी रुपयांत देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
“सरकार अदानींच्या पायावर नतमस्तक का होत आहे?” असा सवाल करत वडेट्टीवार यांनी या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली.
#VijayWadettiwar #Adani #MaharashtraPolitics #Assembly #BreakingNews
‘तुळजाभवानी मातेची हजारो एकर जमीन लाटली’
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी तुळजाभवानी मंदिराच्या इनाम जमिनींबाबत गंभीर आरोप केले. ४,१२१ एकर इनाम जमिनीपैकी हजारो एकर जमीन नियमबाह्य पद्धतीने खासगी व्यक्तींच्या ताब्यात गेल्याचा दावा त्यांनी केला. जगदंबा न्यासाची ४०३ एकर जमीन, ६३ एकर विक्री आणि २६१ एकर जमीन ७३ खासगी व्यक्तींच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
#JayantPatil #TuljaBhavani #MaharashtraAssembly #LandScam #BreakingNews
बेकायदा औषध विक्री दिसल्यास त्वरित तक्रार करा; FDAचा टोल-फ्री क्रमांक जाहीर
राज्यात बेकायदा औषध विक्री आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू ठेवली आहे. विनापरवाना औषध व सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या १५ ठिकाणी छापे टाकून २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींप्रकरणी ८ ठिकाणी कारवाई करत २.२७ लाखांची औषधे जप्त करण्यात आली, तर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांवरही मोठी कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना संशयास्पद औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा बेकायदा विक्रीची माहिती तात्काळ FDAच्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
#FDA #TukaramMundhe #DrugSafety #Maharashtra #HealthNews