प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
While this is the story of many temples across India, what can be said about a government that feigns sleep, ignoring the alarm raised by a private auditing firm regarding potential misappropriation of funds at this very temple? First foreign invaders looted these temples for centuries, now are Hindus themselves looting their own temples in some twisted form of retribution? And yet, neither the Prime Minister, the Home Minister, nor a single leader from the Centre is willing to speak up? Or is the usual game of ‘Shah’-Kat Shah (Marathi for chess moves or political one-upmanship), playing out here as well? Assembly elections are due in Uttar Pradesh next year. The opposition will certainly raise this issue then. This would inevitably corner Yogi Adityanath, potentially causing him some damage and stalling his Prime Ministerial ambitions. While this is one possibility, the repercussions of the ongoing internal power struggle within the BJP regarding ‘who comes next’, could manifest anywhere, ranging from the poaching of MPs and MLAs to temples. The country's Home Minister, Amit Shah, is currently preoccupied with hazy dreams of how to dismantle opposition parties and ascend to the Prime Minister's chair as soon as possible; consequently, in his view, there is no reason to attach any importance to what is happening in the abode of Lord Ram.
The Hindu public deserves accountability for the blow dealt to their faith. Those who turned a blind eye while all this was happening must face severe punishment. I believe the Prime Minister’s intentions are sincere, at least in this regard, but good intentions alone are not enough; action is expected. Otherwise, it will have to be said that you and your party, driven once again by the lure of the throne, have sent Lord Ram into exile and pushed his devotees into the Saryu River.
Raj Thackeray
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
शब्दांत धार, विचारांत वादळ, व्यंगचित्रातून समजमानाचा वेध घेणारे आणि मराठी स्वाभिमानाचा बुलंद हुंकार...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
#HBD_Saheb@RajThackeray@mnsadhikrut
लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का ? हे केलंत तर देश पण करेल. आणि तसाही पर्याय काय आहे ? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत.
माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका ! आपण पंतप्रधान झाल्या पासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं ,हे कशामूळे झालं ते सांगा ! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले ? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे , ऐकून घ्यायचे . आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार ? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका.
तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेंव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं !
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?
वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.
मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?
बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.
पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.
माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.
मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील.
राज ठाकरे ।
स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.
आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा.
बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे.
राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.
बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे 'बाळासाहेब' आणि 'मराठी' या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही.
स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते.
- गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार!
- मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट.
- अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली.
- भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत.
- तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून?
- सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
- जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल.
सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का?
- वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार.
- आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल.
- एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे.
- देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?
- काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली?
- तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे.
- मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत.
- माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू.
- हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते.
- ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा.
- माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा.
- ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते.
- जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो.
- 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
राज ठाकरे ।
वांद्रे किल्यावर दारूपार्टी साठी सरकारची परवानगी ? आणि नवी मुंबईत ४ महिने शिवरायांच्या पुतळ्या भोवती गुंडाळलेले हिरवे कापड व प्लास्टिक हटवून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करून हारफुल वाहून जनतेच्या दर्शनासाठी खुले केले म्हणून मनसे नेते अमितजी ठाकरे व आमच्या ७० सहकाऱ्यांवर गुन्हे ? ‘शिवद्रोही सरकारचा’ निषेध !
६३ कोटीचा दसरा मेळावा
नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती!!
मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले.
सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था……. असं सगळं मिळून हे ६३ कोटी लागणार आहेत म्हणे.
या ६३ कोटी मध्ये अतीवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांच सोनं असायच. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून ३६ चा आकडा मोडून ६३ ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा!!
नाकी नऊ आले म्हणतात ते हेच!!
रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच ६३ कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे ६३ कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा…
#दसरा #६३कोटींचामेळावा
#शिवसेना #उद्धवठाकरे #दसरामेळावा #मराठवाडा #शेतकरी #बाळासाहेबठाकरे #राजकारण #मराठवाडा_पूर
६३ कोटीचा दसरा मेळावा
नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती!!
मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले.
सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था……. असं सगळं मिळून हे ६३ कोटी लागणार आहेत म्हणे.
या ६३ कोटी मध्ये अतीवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांच सोनं असायच. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून ३६ चा आकडा मोडून ६३ ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा!!
नाकी नऊ आले म्हणतात ते हेच!!
रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच ६३ कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे ६३ कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा…
#दसरा #६३कोटींचामेळावा
#शिवसेना #उद्धवठाकरे #दसरामेळावा #मराठवाडा #शेतकरी #बाळासाहेबठाकरे #राजकारण #मराठवाडा_पूर