संयमी, शांत आणि अभ्यासू राजकारणी आणि तितकेच हळव्या मनाचे कवी अशी ओळख असणारे, देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
स्व. आर. आर. पाटील हे सबंध महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे आबा या नावाने ओळखले जात होते. सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी वापरायची असते, हे आबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
पारशी समाजात प्रेम, बंधुता यासाठी पतेती हा सण ओळखला जातो. पतेती हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस. सर्व पारशी बांधवांना पतेतीच्या अर्थात नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व देशभक्तांना विनम्र अभिवादन!
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी व संविधानीक मूल्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा निश्चय करूया. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नाशिक शहरातून दलित चळवळ बुलंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. कुणी आंदोलनातून, कुणी मोर्चातून. यात एक नाव अग्रभागी होते ते म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक. आंबेडकरी चळवळीमध्ये समाजप्रबोधनासाठी योगदान देणाऱ्या लोककवी, शाहीरांमध्ये सिन्नर तालुक्यातील देशवंडी या छोट्याशा खेड्यातील भूमिपुत्र असणाऱ्या वामनदादांचे स्थान अव्वल आहे. या चळवळीचा सुवर्ण कालखंड त्यांच्या योगदानाने झळाळून निघाला होता.
'सांगा आम्हाला बिर्ला, टाटा कुठाय हो?, ‘सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो?' अशा त्वेषपूर्ण शब्दात समाजाच्या विषम व्यवस्थेला सवाल करणारे शाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीच्या सुवर्ण कालखंडातील बिनीचे शिलेदार महाकवी वामनदादा कर्डक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकताच सुरू झाला होता. गरिबी हे आव्हान होते आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधने होती.
अशावेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली असे व्यक्तिमत्व म्हणजे कुस्ती पैलवान खाशाबा जाधव..!
मराठमोळ्या खाशाबा यांचे आयुष्य काही कमी प्रेरणादायी नव्हते. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो. अशा प्राविण्य-ग्रण्य व्यक्तिमत्त्वास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे धडाडीचे व्यक्तिमत्व, लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या छोट्याशा गावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे दिवंगत नेते विलासरावजी देशमुख.
देशमुखांचा राजकारणातील प्रवास उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहेच शिवाय महाराष्ट्रातील जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. विलासरावजी हे अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचे हसरे, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे नेते माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
देशाच्या उन्नतीत युवा वर्गाचा मोलाचा वाटा असतो. सक्षम युवापिढी ही समाजरचनेतील एक महत्वाचा घटक आहे. युवावर्गाला सकारात्मक आणि रचनात्मक बळ द्यायला हवं. आजच्या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा पिढीला अधिक रोजगाराभिमुख आणि सशक्त बनवण्याचा निर्धार करूया!
महात्मा गांधीजींनी ‘भारत छोडो’चा नारा दिल्यावर, देशात ९ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटीश सत्तेला हादरे देण्यासाठी साऱ्या भारतीयांमध्ये बंडाची ठिणगी पेटली. परकीय राजवटीविरूद्ध क्रांतीची मशाल प्रज्वलित करणाऱ्या असंख्य हुताम्यांना ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
जगविख्यात कवि, लेखक, चित्रकार, संगीतकार, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि राष्ट्रगीताचे रचनाकार तसेच नोबेल पुरस्कार विजेते, बहुआयामी व्यक्तीमत्व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
जुलमी इंग्रज सरकारविरोधात क्रांतीचा एल्गार करून प्रतिसरकार स्थापन करण्याचे कार्य क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले. शिक्षण व वाचन संस्कृतीचे मूल्य ग्रामीण भागातील जनतेत रुजवून लोकजागृती करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.
ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.
ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.
राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त, प्रख्यात कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन अत्यंत दुःखदायक व वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टी बरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.
लोकमान्य टिळक हे आधुनिक भाष्यकार आणि समाजधुरीण राजकीय नेते होते. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा पुरस्कार करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
वाघांच्या अधिवासाचे संरक्षण, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार विविध गोष्टींमुळे वाघांचे क्षेत्र धोक्यात येऊ लागले आहे. यावर अंकुश येणे गरजेचे असून वाघांच्या संवर्धनासाठी व त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प जागतिक व्याघ्र दिनानिमित्त करूया.
मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी क्षेपणास्त्र आणि अणुशक्ती क्षेत्रात भारताला शक्तिशाली बनवलं. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
कारगिल विजय दिवस हा देशवासियांच्या हृदयावर अभिमानाने कोरला गेलेला आहे. कारगिल युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व भारतीय वीरांना मानवंदना देत त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया!
लोकशिक्षणाला प्रभावी अस्त्र मानून सामाजिक चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी देशभरात केले. टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू करून लोकांमध्ये सामाजिक एकात्मतेची जाणीव निर्माण केली. परकीयांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!