श्रीमत् दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी शिवथरघळ येथे शके १५८१ म्हणजेच इ.स. १६५९ साली केले.
आतां असो हें पुढती । पुढें रहावें कोणें रीतीं ।
तेंचि निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५॥
आता हा विषय पुरे आता पुढील समासात आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर साधकाने कशा प्रकारे रहावे याचे निरूपण केले जाईल ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे, असे समर्थ म्हणतात. (६५)
#म
देहाहंता जोपर्यंत सूक्ष्म का होईना शिल्लक असते, तोपर्यंत साधकाच्या मनात आपण बद्ध की मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो. आत्मवस्तु ही देहातीत असते. त्या आत्मवस्तूशी ऐक्य पावून जो देहातीत होतो, तो साधू कायमचा निःसंदेह होतो. (६४)
#म
म्हणोन मुक्त विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान ।
शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३॥
म्हणून ज्यांना आत्मज्ञान होते, ते सर्व लोक मुक्त म्हणावेत. पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान झाले की, मग मुक्तपणाही मायिकच ठरतो. (६३)
#म
स्वप्नात एखाद्याला प्रथम आपण बद्ध आहोत असे वाटते व स्वप्नातच आपण आता मुक्त झालो असे खात्री- पूर्वक वाटते. पण जागे होताच ते स्वप्न होते हे त्याला कळून येते. मग कोण बद्ध झाला आणि कोण आणि कसा मुक्त झाला म्हणावे, हे त्याला कळतच नाही. (६२)
#म
म्हणून बद्धता आणि मुक्तता या मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अश्वाप्रमाणे मिथ्या असून मायेमुळेच त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात असताना स्वप्नदृश्य खरे वाटते, पण जागृती आली की स्वप्न व त्यातील दृश्य मिथ्या असल्याचे कळून येते. (६१)
#म
असो बद्धता आणि मुक्तता । आली कल्पनेच्या माथां ।
ते कल्पना तरी तत्त्वतां । साच आहे ॥ ६०॥
कल्पनेमुळे बद्धता आणि मुक्तता या अवस्था भासतात, पण ज्या कल्पनेमुळे त्या भासतात ती कल्पना तरी कुठे खरी आहे ? (६०)
#म
एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम ।
मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९॥
थोडक्यात म्हणजे मी बद्ध, मी मुक्त हा अवघा श्रमच आहे. देहाहंतेमुळेच हे श्रम होतात. कारण मायातीत असा जो स्वस्वरूपानुभवरूप विश्राम त्याचा अनुभवच अद्याप आलेला नसतो. (५९)
#म
म्हणजे बद्ध कोण होता, मुक्त कोण झाला, तो कोणी का असेना, तो आपण नव्हे हे शुद्ध ज्ञानी जाणत असतो. ज्याला कुणाला मी मुक्त झालो असे वाटते, त्याला ते ‘ मीपण ‘ च बंधनकारक ठरते व तो बंधनात पडतो. (५८)
#म
जेथें नाम रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे ।
मुक्त बद्ध हें विसरे । विसरपणेंशीं ॥ ५७॥
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपही उरत नाही, तर मुक्तपणा कसा उरेल ? खरा शुद्ध आत्मज्ञानी मी बद्ध किंवा मुक्त हे तर विसरतोच, पण आपण ते विसरलो ही जाणीवही तो विसरतो. (५७)
#म
तत्त्वज्ञाता परमशुद्ध । तयासि नाहीं मुक्त बद्ध ।
मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६॥
परमशुद्ध असा आत्मज्ञानी असतो तो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण यांचा बद्ध, मुक्त हा खेळ असतो. (५६)
#म
बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो न मे वस्तुतः ।
गुणस्य मायामूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १॥
श्लोक अर्थ - बद्ध, मुक्त हे वर्णन गुणांच्या क्षेत्रात येते, आत्मावरच्या दृष्टीने ते योग्य नाही. गुणांचे मूळ माया आहे आणि ती तर खरी नाही. म्हणून आत्म्याला बंधनही नाही आणि मोक्षही नाही.
#म
ज्यायोगे बंधन झाले असे वाटते तेच मुळी मिथ्या आहे. जर बंधनच मिथ्या, तर मुक्ती तरी खरी कशी असणार ? म्हणून सखोल विचार केल्यावर कळून येते की, बंधन आणि मुक्ती त्रिगुणांमुळे भासत असतात, म्हणून सर्व काही मिथ्याच असते. (५५)
#म
मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला ।
मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४॥
मीपणापासून जो सुटतो तो माणूस मग मुका असो अथवा बोलका असो, तोच मुक्त झाला असे जाणावे. (५४)
#म
जर कुणी म्हणेल की, ‘ मी ‘ मुक्त आहे तर तेथे मीपणा येतोच. म्हणून अशी मुक्तपणाची शिळा पोटाशी बांधून कुणी भवसागर तरून जाण्याचा जर प्रयत्न करील, तर त्या शिळेमुळे तो बुडून पार पाताळात जाईल. जोपर्यंत देहबुद्धीचा अडसर दूर होत नाही, तोपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही. (५३)
#म