भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे.
अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं.
जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे. #रोजगार #महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेची ठिणगी ही मराठी मुला-मुलींची नोकर भरतीच्या प्रश्नावर झाली होती हे महाराष्ट्राला माहित आहेच पण तेव्हापासून आजपर्यंत, आणि उद्याही जेव्हा जेव्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या रोजगाराच्या संधी मराठी माणसालाच मिळतील ह्यासाठी दक्ष असते आणि भविष्यातही असेल !
#मनसे #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #मराठीमाणूस
महाराष्ट्रातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच हव्यात... सर्वोच्च न्यायालयाचे आदेश... शेवटचा १ दिवस बाकी !
कायदा हातात घेतात म्हणून महाराष्ट्र सैनिकांना केसेस टाकून छळलंत पण कायदा धाब्यावर बसविणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर काय कारवाई होते ते आता आम्ही पाहणार... त्यामुळे तत्परतेने कारवाई होईल अशी अपेक्षा आहे अन्यथा आम्ही आहोतच !
#मनसेदणका #एकत्रमराठी #सर्वत्रमराठी
"राजसाहेबांचं व्हिजन मला आवडतं, मी त्यांनाच मतदान करणार" असं तरुणाई त्यांच्या मित्रमंडळींच्या, कौटुंबिक चर्चेत बेधडक बोलते पण जेव्हा मतदान करायची वेळ येते तेव्हा मात्र ढिलाई होते आणि प्रश्न न सोडविणारे प्रतिनिधी विजयी होतात आणि विविध प्रश्नांवर झगडणारे मनसेचे शिलेदार अपयशी होतात. आता असं करून चालणार नाही.
राजसाहेबांची माणसं सभागृहात पोहचली तरच राजसाहेबांच्या शैलीत झटपट प्रश्न निकाली लागतील. म्हणून येणारी प्रत्येक निवडणुकीत तुम्ही मतदान करायलाच हवं, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आपलं बहुमूल्य मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता पदवीधर निवडणुका घोषित झाल्या आहेत... त्यासाठी काय प्रक्रिया असते? त्यात पदवीधर मतदारांनी कशी नोंदणी करावी? ह्याची माहिती देणारा हा मनसे नेते श्री. अभिजित पानसे ह्यांच्या एक्स्प्लेनर व्हिडीओ.
पदवीधर मतदार नोंदणीकरता ८१६९९९३६२५ ह्या क्रमांकावर missed call द्या किंवा WhatsApp करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकरता आम्ही संपर्क करू.
आपल्या भागातील सर्व क्षेत्रातील पदवीप्राप्त तरूण-तरुणींनी आपली पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी. आपण मिळवलेल्या पदवीला एक सन्मान देऊया, पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणी करुया..!
तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं 'देश तोडणारे खलनायक' म्हणून चित्रं उभं केलं जातं आणि आपलेच मराठी जाणते मान्यवर आम्हाला संकुचित ठरवून मोकळे होतात.
आज तृप्ती देवरुखकर ह्यांना आलेल्या अनुभवानंतर तत्परतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीला धावून गेली. त्या माणसाला जाहीर माफी मागायला लावली. पण हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण हिणवणं, तुच्छ लेखणं, तुसडेपणाने वागवणं हे मराठी माणूस रोज मुंबईच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अनुभवत असतो पण मुंबई-महाराष्ट्रावर इतकी वर्ष राज्य करूनही कोणताही राज्यकर्ता इतरांची मतं जातात म्हणून ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. मराठी जनांनी हे लक्षात घ्यायला हवे.
#मनसेदणका
जेव्हा जेव्हा मराठी मनांवर, हिंदू सणांवर बंधनं लादली जातात तेव्हा तेव्हा शिवतीर्थावरून 'राज'गर्जना होते... आणि लढवय्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढे समोरच्यांना झुकावंच लागतं ! #गणेशोत्सव#GaneshChaturthi#ganeshotsav2023
सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.
- राजसाहेब ठाकरे
१७ वर्ष रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष सुरु आहे. ह्या महामार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, कोकण जागर यात्रा २७ ऑगस्टला होणार आहे. ह्या यात्रेचा मार्ग कसा असेल ह्याबद्दल पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर ह्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
#कोकण_जागर_यात्रा
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित झाली म्हणून आज फक्त राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले पण अशाच निवडणुका स्थगित होत राहिल्या तर उद्या लोकं रस्त्यावर उतरतील... मग काय कराल? लोकशाहीत निवडणुकांना घाबरून कसं चालेल ? मनविसे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे ह्यांची रोखठोक पत्रकार परिषद.
निर्धार मेळावा, पनवेल । भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
▪️ आज मी इथं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय.
▪️ कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. अहो, आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात रस्ते चांगले बंधू शकत नाही का?
▪️ २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही?
▪️ फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात... लोकांचे ह्या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं?
▪️ भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.
▪️ लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर "मी तुला दिसलो का? मी होतो का." म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का?
▪️ अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं.
▪️ मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं की अहो समृद्धी रस्ता करून इतके दिवस झाले पण अजून तुम्ही फेन्सिंग का नाही केलं? रस्त्यावर अनेक प्राणी येत आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, गाड्यांचे अपघात होत आहेत. इतकी साधी गोष्ट पण सरकारच्या लक्षात येऊ नये ?
▪️ आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या.
▪️ मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?
▪️ आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या हजारो एकर जमिनी कोणी बळकवल्या? ह्याचा शोध घेतलाच गेला पाहिजे.
▪️ मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत.
▪️ जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर ह्याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील.
▪️ २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.
▪️ गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही.
▪️ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री.
▪️ ३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं.
▪️ पण तुम्ही कश्मीर असो, हिमाचल असो की आपल्या ईशान्य भारतातील राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली ?
▪️ शिवडी-न्हावाशेवा रस्ता होणार तेव्हा बघा रायगड जिल्ह्याची काय अवस्था होते. तिथल्या जमिनी आधीच परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत आणि पुढे जाऊ परिस्थिती अशी होणार कि फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार.
▪️ मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात माझा मंडणगडचा तालुकाध्यक्ष तर एक शीख सरदार आहे.
▪️ अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं?
▪️ अमेरिकेत १९२७ च्या महामंदीच्या काळात सरकारने लोकांना पैसा देता यावं म्हणून अमेरिकेत रस्त्यांचं जाळं उभारलं, त्याच्यावर आजची अमेरिका उभी राहिली.
▪️ माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे.
▪️ ह्या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया.