आशाताई गेल्या. एक रुखरुख कायम राहील ते म्हणजे माझ्या नेहमीच्या भिडस्त स्वभावामुळे त्यांच्यासोबतचा फोटो राहून गेला.
२०२१ पासून गेल्या ४ वर्षांत आशाताईंना चारपाच वेळा निवांतपणे भेटण्याचा प्रसंग आला. माझ्या आठवणीप्रमाणे २०२२ फेब्रुवारीला एका दुपारी माझे मित्र आणि लतादीदी आणि आशाताईंचे भाचे योगेश खडीकर यांच्या घरी अचानक जवळपास ४ तास भेटण्याचा, त्यांच्यासोबत जेवणाचा आणि गप्पा मारण्याचा योग आला. आणि त्या गप्पा होत्या, वाट्टेल त्या विषयांवरती..
कुठे नवीन काय खाल्लं इथपासून ते आशाताईंचा आणि माझा वाढदिवस कसा एकाच दिवशी असतो इथपर्यंत काहीही. त्या भेटीत एक वाक्य सहज म्हणाल्या, 'अहो तुम्ही फार ओझं घेता का हो ? घेऊ नका, जितकं ओझं घ्याल तितकं अजून डोक्यावर पडेल. आजचा दिवस जगा, उद्याचं उद्या बघा.
निघताना मी त्यांना वाकून नमस्कार केला तेंव्हा म्हणाल्या काय आशीर्वाद देऊ, मी काही बोलायच्या आत म्हणाल्या भरपूर आनंदी रहा.
त्यानंतर आशाताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्यावेळेस त्या पुरस्कार सोहळ्याच्या मॅनेजमेंट टीममध्ये होतो तेंव्हा एकदोनदा भेट झाली. पण त्या दुपारचे चार तास कधीच विसरता येणार नाहीत.
आशाताईंनी आयुष्यात दुःखाचं हलाहल पचवलं आणि गळ्यातून अमृत बाहेर काढलं. त्यांच्या जगण्याची फिलॉसॉफी काय होती म्हणजे त्यांच्या शब्दांत हे कुठे ऐकली नाही. पण नजाकत, आवेग, उन्माद आणि वैराग्य एकाच गळ्यातून निघतं, याचा अर्थ बाईंनी दुःख हे आयुष्यभराचा सोबती असतो, त्यामुळे त्याच्याशी मैत्री करून टाकायची हे तत्व स्वीकारलं असणार. आणि बहुदा हीच त्यांच्या जगण्याची फिलॉसॉफी असणार.
आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
एक नवीन प्रोजेक्ट एक नवीन जबाबदारी. श्री. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे महाराष्ट्राचा विकास आराखडा आणायचा ठरवला आणि तो इंटरॅक्टिव्ह असावा अशी त्यांची इच्छा होती. या विकास आराखड्यात त्यांचा एक नवीन अप्रोच होता की सामान्य माणसांना पण त्यांच्या कल्पना पण देता आल्या पाहिजेत आणि त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी त्या कल्पनांचा अभ्यास करून, त्यातल्या उत्तम कल्पना निवडायच्या आणि त्याचवेळेस तज्ञांनी पण त्यांचा अभ्यास मांडायचा आणि त्यातून एक मोठा विकास आराखडा तयार करायचा. विकास म्हणजे फक्त रस्ते, पूल नाही. 'डेव्हलपमेंट' ही कल्पना अनेक अंगानी बघावी लागते. सो त्याचा अभ्यास आम्ही सुरु केला.
एखाद्या राज्याचा विकास आराखडा (ब्ल्यूप्रिंट ) असं म्हणलं की त्यात किती अफाट पैलूंचा विचार करावा लागतो हे जाणवायला लागलं. हे अतिप्रचंड काम होतं. श्री. राज ठाकरे, अनिल शिदोरे सर यांचं मार्गदर्शन होतंच. अनेक मिटींग्स झाल्या. आणि जवळपास २९० क्षेत्र निवडली की ज्याचा विचार झाला नाही तर विकास आराखडा पूर्ण होऊच शकत नाही. मी आजपर्यंत कन्टेन्टवर बऱ्यापैकी काम केलं आहे. गेल्या २० वर्षात ७,८ हजार तासांचा ऑडिओ व्हिज्युअल कन्टेन्ट माझ्या हाताखालून गेला असेल. सोशल मीडियाच्या बाबतीत तर गेल्या ११ वर्षांत जवळपास २२ हजार पोस्ट्स आणि ट्विट्स लिहिल्या गेल्यात, ५० हुन अधिक आर्टिकल्स असं बरंच काही झालं असलं तरी इथे पॉलिसी लेव्हलचा विचार करायचा होता. ही जबाबदारी माझ्याकडे आली ती निव्वळ राज ठाकरेंनी विश्वास दाखवला म्हणून.
१९ मार्च २०२६ ला या संभाव्य विकास आराखड्याची वेबसाईट पब्लिश झाली. आणि गेल्या ४८ तासांत ५० हजारहुन अधिक लोकांनी या वेबसाईटला भेट दिली आणि मोठ्या प्रमाणावर सजेशन्स आल्या. आत्ताशी या कामाची सुरुवात आहे पण तरीही हे काम अतिप्रचंड होतं आणि आपल्याला हे जमेल असं मला वाटणं वेगळं आणि केतनला हे जमेल हे राज ठाकरेंना वाटणं वेगळं. पण हे झालं. पॉलिसी किंवा धोरण यांत आपण काहीतरी करायला सुरुवात करू शकतो ( अजून अतिदीर्घ मोठा टप्पा गाठायचा आहे याचं भान मला आहे ) याचा आनंद वाटतोय.
अर्थात श्री. राज ठाकरे, श्री. अनिल शिदोरे ( शिदोरे सरांनी २०१४ साली महाराष्ट्राच्या इतिहासातला एक दीर्घ विकास आराखडा आणला होता.) यांच्याबद्दलची जशी कृतज्ञता आहे तसं असं कुठलंही काम करताना सौरभ करंदीकर नसेल तर मी अशा कामांचा विचार पण करू शकत नाही. सौरभने २०१४ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विकास आराखड्याची वेबसाईट अप्रतिम केली आणि यावेळेस पुन्हा त्याने पूर्ण मॉडर्न डिझाईन सेन्सिबीलीटीज वापरून वेगळ्या अप्रोचने ही वेबसाईट आणली.
ही वेबसाईट बघा... त्यात मी इन्व्हॉल्व होतो म्हणून बघा का ? तर उत्तर हो आहेच. पण महाराष्ट्रातील एका नेत्याने इतका महत्वकांक्षी प्रोजेक्ट आणला आहे आणि तो आपल्या राज्यासाठी आहे म्हणून बघा... आणि इतकंच नाही या २९० क्षेत्रांत काय व्हायला हवं याबद्दलच तुमची मतं असतील किंवा तुम्हाला अशी कोणी माणसं माहित असतील जे या क्षेत्रांत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग राज्यासाठी करून देऊ इच्छितात त्यांची नावं सुचवा आम्ही त्यांच्याशी संपर्क करू. https://t.co/XlvokBENkt @mnsadhikrut
Interesting evening in Pune at a roundtable hosted by deAsra Foundation (CSR arm of Persistent Systems).
Good conversations on entrepreneurship, digital content and the startup ecosystem.
A few takeaways:
• Gen Z isn’t difficult to retain — they just expect fair pay and work-life balance.
• Many micro-entrepreneurs struggle with compliance awareness more than ideas.
• Often the mundane, disciplined work builds businesses — not just exciting ideas.
• Entrepreneurs today sometimes prioritize personal brand before company building.
Also it was a privilege to interact with Anand Deshpande Sir , whose journey in building Persistent Systems stands as one of the most remarkable entrepreneurship stories in India’s IT sector. @anandesh
पॅनोरमा २५ चा नवा एपिसोड आहे स्टीव्ह जॉब्सवरचा. डिझाईन- लोकांना काय आवडेल या पेक्षा लोकांना उत्कृष्टतेची सवय लावली पाहिजे आणि त्यासाठी अफाट सातात्यतेने काम करत राहणं म्हणजे स्टीव्ह जॉब्स... फोन असावा तर अॅपलच्या फोनसारखा असं वाटायला लावण्याइतकं उत्कृष्ट प्रॉडक्ट डिझाईन करणारा स्टीव्ह जॉब्स.
मुळात प्रत्येक प्रॉडक्टची एक फिलॉसॉफी असायला हवी असं मानणारा स्टीव्ह जॉब्स. आज आपण स्मार्ट फोन वापरतो ते स्मार्ट आणि वापरायला सोपे आहेत, ते स्मार्ट पण आणि सोपे सुद्धा कसे असावेत हे शिकवलं स्टीव्ह जॉब्सने.
स्टीव्ह जॉब्सचा एक एपिसोड करायचा ठरवलं तेंव्हा 'सौरभ करंदीकर' शिवाय दुसरं नाव सुचणं शक्यच नव्हतं. त्याच्या देव्हाऱ्यात बहुदा स्टीव्ह जॉब्स असेल. स्वतः उत्कृष्ट युजर एक्स्पीरियंस डिझायनर असलेला सौरभ स्टीव्ह जॉब्सच्या प्रेमात पडला नसता तर आश्चर्य. तर सौरभ करंदीकरने सादर केलेला हा एपिसोड नक्की बघा.
https://t.co/nRnYM7x8jx
#मराठी #मराठीतरुण #महाराष्ट्र #मराठीविचा #नवामहाराष्ट् #विचारक्रांत #Ketanalytics
दुबईची वाढ मंदावली तर पुढची जागतिक शहरं कुठे उभी राहतील?
गेल्या काही दिवसांत मध्यपूर्वेतील तणाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे एक प्रश्न डोक्यात आला – जर या परिस्थितीचा परिणाम दुबईवर झाला तर पुढची मोठी जागतिक शहरं कुठे उभी राहू शकतात?
काही आठवड्यांपूर्वी दुबईत गेली २५ वर्षे राहणाऱ्या एका मित्राशी बोलत होतो. तो दुबईच्या प्रचंड वाढीबद्दल सांगत होता. पण काही दिवसांपूर्वी पुन्हा बोललो तेव्हा त्याच्या आवाजात काळजी जाणवत होती.
खरं पाहिलं तर दुबई ही फक्त एक शहर नाही, ती एक कल्पना आहे. या कल्पनेचा पाया आहे, 'स्थैर्य आणि सुरक्षितता'. यामुळेच दुबई हे व्यापाराचं,या अर्थकारणाचे आणि पर्यटनाचं केंद्र बनलं. पण या युद्धाने सगळे संदर्भ बदलतील आणि दुबई गुंतवणूकदारांच्या नकाशावरून नाहीसे होईल, असं पण काही होणार नाही.
इतिहास सांगतो की मोठी शहरं अचानक नाहीशी होत नाहीत. हां, कालांतराने या शहरांचा गुंतवणूक खेचून घेण्याचं मॅग्नेट कमी होत जातं आणि त्याचा फायदा इतर शहरं घेतात.
एखादं शहर जागतिक केंद्र बनण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात:
• भौगोलिक स्थान
• राजकीय स्थिरता
• जागतिक व्यापार आणि भांडवलाशी जोडलेपण
• उत्पादन किंवा आर्थिक क्षमता
* जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्याची ताकि
या दृष्टीने पाहिलं तर काही प्रदेश वेगाने पुढे येताना दिसतात.
दक्षिण आणि आग्नेय आशिया
हो ची मिन्ह सिटी, जकार्ता आणि बेंगळुरू यांसारखी शहरं उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रामुळे महत्त्वाची होत आहेत. चीनवरची अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांतून व्हिएतनाम आणि इंडोनेशिया विशेष पुढे येत आहेत.
भारताचा आर्थिक कॉरिडॉर
भारताची वाढ कदाचित एका महानगराभोवती नसेल तर अनेक आर्थिक पट्ट्यांभोवती होईल. मुंबई–पुणे–हैदराबाद हा त्यातील एक संभाव्य कॉरिडॉर ठरू शकतो. भारतातला हा सगळ्यात जबरदस्त आर्थिक कॉरिडॉर ठरू शकतो. २०२६-२०२७ केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मुंबई-पुणे-हैद्राबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली. अनेकांना काय करायची बुलेट ट्रेन असं वाटून पण गेलं. पण ही बुलेट ट्रेन या कॉरिडॉरचा पाया आहे. अर्थात यासाठी पुणे विमानतळ, मुंबईतले सगळे मेट्रो प्रोजेक्ट्स वेळेत होणं गरजेचं आहे. आणि खरोखरचा इज ऑफ डुईंग बिझनेस आणावा लागेल.
आफ्रिकेतील नव्या संधी
लागोस आणि नैरोबी ही शहरं फिनटेक, डिजिटल उद्योजकता आणि प्रादेशिक व्यापाराची केंद्रं बनताना दिसत आहेत.
ऍमस्टरडॅम सारखं शहर जे १६ व्या शतकात जगाच्या व्यापाराचे केंद्र होते तिकडे आता फिनटेक, एआय आणि बायोटेक मध्ये मोठी गुंतवणूक होत आहे.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते – भविष्यात एकच जागतिक शहर असेल असं नाही.
त्याऐवजी तंत्रज्ञान, वित्त, लॉजिस्टिक्स आणि नवकल्पनांची वेगवेगळी केंद्रं असलेल्या शहरांचं एक जाळं तयार होईल.
खरा प्रश्न हा नाही की दुबईची जागा कोण घेईल.
खरा प्रश्न असा आहे:
पुढच्या वीस वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन केंद्रं बनण्यासाठी कोणती शहरं शांतपणे तयारी करत आहेत?
यांत मराठी मुलामुलींनी मुंबई-पुणे-हैद्राबाद कॉरिडॉरचा खरंच फायदा घ्यायला हवा. आपल्या राज्यात हे सगळं घडणार आहे.
#मराठी #मराठीतरुण #महाराष्ट्र #मराठीविचा #नवामहाराष्ट् #विचारक्रांत #Ketanalytics
भारताला अनिश्चित काळात ‘Strategic Depth’ का आवश्यक आहे? तीच स्ट्रॅटेजिक डेप्थ मराठी माणसाने पण स्वतःत रुजवली पाहिजे का ?
• अमेरिका–इस्रायल–इराण तणावानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली — आजच्या काळात डिप्लोमसी म्हणजे दोरीवर तोल सांभाळत चालण्यासारखं आहे.
• परराष्ट्र धोरण हे आता विचारधारेवर नाही तर तुमच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. देशाला विनाअडथळा, खनिज तेल, दुर्मिळ खनिजे, तंत्रज्ञान हे विनाअडथळा मिळायला हवं. आणि हे सगळं होत असताना तुमच्या देशाकडून जी काय निर्यात होऊ शकते त्यात देखील कोणी अडथळा आणला नाही पाहिजे.
• हे करताना प्रत्येक देशाला काही नैतिक भूमिका पण घ्यावी लागते. उदाहरणार्थ इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या भांडणात, आपल्याला चिंता व्यक्त तर करावीच लागेल. पण हे करताना आपण कोणाच्यातरी कळपाकडे सरकतोय हे चित्र पण नाही दिसलं पाहिजे. कारण अंतिमतः आपला व्यापारी फायदा, आपल्याला भविष्यात लागणारी मदत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेचा पाया असलेलं खनिज तेल हे मिळत राहील हे पण बघावं लागतं.
• भारतासाठी stakes खूप मोठे आहेत — 1.5 अब्ज लोकसंख्या, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, जागतिक उत्पादन केंद्र होण्याची आपली महत्वकांक्षा आहे आणि हे करताना जगातील प्रत्येक मोठ्या अर्थव्यवस्थेला या देशाची १.५ अब्ज लोकसंख्येची बाजारपेठ हवी आहे. त्यामुळे कोणत्याही गटाशी जुळवून न घेणे पण हे करताना आपण सगळ्यांसोबत आहोत हे दाखवत राहणे आणि हे सगळं करताना आपली अर्थव्यवस्था अबाधित राहील हीच आपली प्राथमिकता आहे.
• आपण अमेरिकेपासून दूर जाऊ शकत नाही कारण डिफेन्स, तंत्रज्ञान यांत त्यांची आपल्याला गरज आहे. आपण खनिज तेल समृद्ध देशांच्या विरोधात जाऊ शकत नाही कारण अर्थव्यवस्था ही खनिज तेलांवर अवलंबून आहे... आणि इंग्रजीत ज्याला हेजींग म्हणतात म्हणजे धोका कमी करण्याचं शास्त्र. त्यासाठी इराण, रशिया या देशांना फ्रेंडलिस्टमध्ये ठेवावंच लागणार. याशिवाय युरोप हा ट्रेड पार्टनर आहे. त्यात पुन्हा फ्रान्स, जर्मनी सारखे देश जे अमेरिकेच्या प्रभावाखाली येत नाहीत आणि त्यामुळे पाकिस्तानधार्जिणे होण्याची शक्यता नाही अशा देशांशी पण मैत्री ठेवली पाहिजे.
• चीनसोबत पूर्ण युती शक्य नाही; पण ‘managed competition’ शक्य आहे.
मग पुढच्या ५ वर्षांत काय करावं लागेल
१) ऊर्जा सुरक्षितता
२) देश मॅनुफॅक्चरिंग हब कसा बनेल हे बघणे
३) जमतील तेवढे अजून मित्र देश जोडणे
४) रशिया, इराण यांच्याशी पण मैत्री अबाधित
५) चीन कुरघोड्या करणार. त्यांच्याशी संवाद तोडू न देणे
हेच मराठी माणसाने पण शिकायला हवं का ? हो... आपण काय करायला हवं ?
१) राजकारण आणि राजकारणी हे तोंडी लावण्यापुरतं ठेवावं.
२) आपलं ध्येय ही आपली व्यक्तिगत अर्थव्यवस्था किती मजबूत होईल, त्यासाठी आपल्याला आवडो न आवडो कोणाकोणाशी मैत्री वाढवावी लागेल किंवा कधी थोडं नमतं पण घेऊन आपण खूप आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ ही आपली प्राथमिकता हवी.
३) विचारधारा ही आर्थिक प्रगती हीच हवी आणि बाकी विचारधारा आणि त्यावर भांडत बसणे याला अर्थ नाही
४) जमतील तितकी नवीन माणसं जोडत राहिली पाहिजेत. त्यात पुन्हा आर्थिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी माणसं जोडणे ही प्राथमिकता हवी.
५) जसं भारताला चीनशी दोन हात करणं शक्य नाही पण म्हणून आपण झुकण्याची गरज पण नाही. मग मार्ग उरतो तो संवाद टिकवून ठेवण्याचा. हाच पर्याय मग तो तुमचा न आवडणारा बॉस असो की कटकट करणारा पण बिझनेस देणारा क्लायंट असू दे या सगळ्यांना सांभाळत, पुढे जात रहायचं. इतपत की तुम्ही आर्थिकदृष्ट्या इतके स्वावलंबी आहात की तुम्हाला त्यांची गरज राहिली नाही असं वाटेपर्यंत.
६) रोज नवीन पर्यायांचा विचार करणे
#ketanalytics #मराठी #मराठीतरुण #महाराष्ट्र #मराठीविचा #नवामहाराष्ट् #विचारक्रांती
इराण युद्धाचा भारतावर होणारा परिणाम
* मध्यपूर्वेतून जे क्रूडऑइल बाहेर पडतं ते होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जातं. या युद्धाचा परिणाम जर या सामुद्रधुनीतल्या मार्गावर झाला तर जगातील जवळपास २० ते ३०% तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होईल.
* भारताचा एकूण क्रूड ऑइल इम्पोर्ट हे ८५% असल्यामुळे जर होर्मूझमध्ये काही गोंधळ झाला तर त्याचा फटका भारताला बसेल कारण आत्ताचा क्रूड ऑईलचा भाव हा साधारणपणे ७२ डॉलर प्रतिबॅरल आहे जो वाढून प्रतिबॅरल ८० पर्यंत जाईल असा अंदाज आहे. असं झालं तर काय घडेल ?
७५ डॉलर्स प्रतिबॅरल :- इतका ताण सहन करण्याची क्षमता भारताकडे आहे
९० ते १०० डॉलर्स प्रतिबॅरल :- भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण येईल. महागाई नक्की वाढेल
१२० डॉलर्स :- याचा मोठा फटका बसेल. एकतर सरकारला खनिज तेलावरचे कर तात्पुरते कमी करावे लागतील किंवा इन्फ्लेशन वाढतंय हे स्वीकारावं लागेल. पण १२० डॉलर्स प्रतिबॅरल ही शक्यता कमीच आहे. आणि आली तरी काही दिवसांची ही फेज असेल.
पण हे सगळं तात्कालिक असेल... कारण
* भारताकडे सध्या ६०० बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त परकीय गंगाजळी आहे.
* २०२२ ला रशिया युक्रेन युद्धानंतर बॅरलची किंमत १२० डॉलर्स गेली होती. याचा अंदाज घेऊन आपण २०२२ नंतर खनिज तेलाचे अनेक पुरवठादार देश शोधले होते. अगदी अमेरिकेचा विरोध असताना रशियाकडून तेल घेतलं होतं.
* अमेरिकेकडून तेल घ्यावं अशी अमेरिकेची इच्छा आहे त्यामुळे कदाचित ताण निवळेपर्यंत भारत अमेरिकेकडून खनिज तेल घेईल. त्यासाठी अर्थात सुएझ कालवा किंवा केप ऑफ गुड होपला विळखा घालून यावं लागेल. पण तो पर्याय आहेच.
येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार पडेल. एक अंदाज असा आहे की निफ्टी कोसळत कोसळत कदाचित २४६०० ते २४७०० पण जाईल. पण अर्थात हीच वेळ आहे एकतर म्युच्युअल फंडात पैसे टाकण्याची किंवा जर इक्विटी मार्केटमध्ये सक्रिय असाल तर लार्जकॅप कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवण्याची.
#मराठी #मराठीतरुण #महाराष्ट्र #मराठीविचा #नवामहाराष्ट् #विचारक्रांत #Ketanalytics
एलॉन मस्क, ज्याने सायन्स फिक्शन वास्तवात आणून दाखवलं. त्याची तीव्र इच्छा आहे की माणसाचं अस्तित्व पृथ्वी नावाच्या ग्रहाच्या पलीकडे न्यायचंच. ज्या X वर हे लिहितोय त्याचा मालक. स्पेस एक्सचा मालक, टेस्ला मोटर्सचा मालक. त्याने त्याच्या कंपन्यांसाठी सीईओ म्हणून टार्गेट्स ठेवली आहेत. ती जर त्याने पूर्ण केली तर तो वर्षाला १ ट्रेलिया डॉलर्सचं मानधन घेणार आहे, ( भारताची अर्थव्यवस्था ३.५ ट्रिलियनची आहे ). आणि तो ज्या कल्पनांवर काम करतोय त्या पूर्ण झाल्या तर आपलं आयुष्य अंतर्बाह्य बदलून जाईल. म्हणून मराठी मुलांनी एलॉन मस्क समजवून घेतलाच पाहिजे. त्यासाठी पॅनोरमा २५ चा हा आमचा एपिसोड नक्की नक्की बघा. श्री. दीपक करंजीकर यांनी अप्रतिम पद्धतीने एलॉन मस्क समजवून सांगितला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच वादळ आपल्या आयुष्यवर येऊन धडकणार आहे का ? तर उत्तर आहे हो.. पण कल्पनाशक्ती आणि तिला वास्तवात आणण्याची दुर्दम्य शक्ती याचा संगम काय असतो हे मस्कच्या रूपाने कळलं तर तुम्हाला याची भीती वाटणार नाही, उलट तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पलीकडचा विचार करू शकाल... एपिसोडची लिंक
https://t.co/Sz7sHbRQpM
#मराठी #मराठीतरुण
#महाराष्ट्र
#मराठीविचार
#नवामहाराष्ट्र
#विचारक्रांती
#Ketanalytics
#AI
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#तंत्रज्ञान
एका नवीन प्रोजेक्टची घोषणा... एक नवीन पॉडकास्ट सीरिज आम्ही सगळे घेऊन येत आहोत. नाव आहे पॅनोरमा २५...
तर... २०२५ चं वर्ष जेंव्हा सुरु झालं तेंव्हा डोक्यात विचार यायला लागले की बघता बघता या नव्या शतकाची २५ वर्ष सरत आली. मग विचार करताना जाणवलं या की पाव शतकांत जितके बदल झाले तितके बदल एका पाव शतकांत तर सोडूच पण एका शतकांत सुद्धा झाले नसतील. मग हे बदल घडवणारे नायक कोण याचा अभ्यास सुरु केला. त्यात सर्व क्षेत्रातील लोकं घेत गेलो आणि अगदी राज्य, देश आणि जागतिक पातळीवरची लोकं. ही यादी अतिप्रचंड होत गेली. मग या लोकांचा प्रवास आणि त्यातून त्या क्षेत्राचा २५ वर्षांचा प्रवास सांगणारी पॉडकास्ट सिरीज डोक्यात आली आणि त्याचवेळेस नाव डोक्यात आलं, 'पॅनोरमा २५'.
मग ही कल्पना सांगितली श्रीकांत बोजेवार सरांना. त्यांना कल्पना आवडली. मग त्यांना या पाव शतकाला आकार दिलेल्या नायक/नायिकांची यादी दाखवली. आणि त्यांना विनंती केली की तुम्ही पण या प्रोजेक्टचा भाग व्हा. मग आम्ही बराच विचार करून ही यादी ३० ते ३५ लोकांपर्यंत आणली. मग यावर कोण बोलेल याचा विचार सुरु केला. काहींचा उत्तम अभ्यास होता तर काहींनी सांगितलं की स्क्रिप्ट द्या आम्ही उत्तम सादर करू. मग मी आणि श्रीकांत बोजेवार सर, स्क्रिप्ट आणि प्रत्येक एपिसोडची चौकट या कामाला लागलो.
यात पॉडकास्ट सिरीजची निर्मिती कोण करणार यावर विचार सुरु असताना मित्रवर्य सुजय पतकी याने सांगितलं की मी करतो आणि याला लागेल तो खर्च पण मी करतो. मग कामाला सुरुवात झाली. आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून एपिसोडच्या शूटिंगला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील बुद्धिवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींनी आणि त्या त्या व्यक्तीबद्दल अभ्यास असलेल्यांनी येऊन या सीरिजसाठी सादरीकरण केलं आहे.
पाव शतक कसं बदललं हे जर आज कळलं तर पुढचं पावशतक कसं असेल याचा अंदाज येऊ शकतो. म्हणून ही सिरीज बघा. दर सोमवारी एक एक एपिसोड येईल. कला, विज्ञान, साहित्य, तंत्रज्ञान, खेळ, उद्योग, व्यापार, राजकारण यांत पाव शतकाला आकार देणारे मानकरी आणि त्यातून महाराष्ट्र, देश आणि जगाचा बदललेला पट दाखवणारी आमची ही पॉडकास्ट सीरिज तुम्हाला आवडेल असं वाटतं. अर्थात. काही कमी जास्त असेल तरी पण नक्की कळवा. चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा
युट्युब चॅनेलची लिंक
https://t.co/KZcNOKOnEt
अजित दादा गेले. महाराष्ट्रातील माझ्या आवडत्या राजकारण्यांच्या यादीतील एक नेता गेला. अजित दादांचं राजकारण तसं रांगडं होतं पण त्यात एक नजाकत होती. २०१४ ला अजित दादांचा जनता दरबार बघितला होता. तेंव्हा पहिल्यांदा जाणवलं की हा माणूस कसला तयारीचा आहे. समोरच्याने तक्रार मांडायला सुरुवात केली की तिसऱ्या वाक्याला दादांना कोणाला फोन लावावा लागेल हे कळायचं. संबंधित अधिकाऱ्याला फोन जायचा. त्या फोनवरचं दरडावण मस्त असायचं. प्रशासन कसं चालतं हे शिकायचं असेल तर हा जनता दरबार खरंच एक शाळा होती. त्यानंतर मी कुतूहलाने अजून एक दोन जनता दरबार पुन्हा ऐकले. खरंच ती शाळा होती.
मी त्या जनता दरबारानंतर अजितदादांना एकदा पुण्यात भेटलो होतो. माझ्या डोक्यात एक कल्पना होती. सुरुवातीला पटकन बोला इत्यादी त्यांनी केलं पण मग जसं जसं प्रेझेंटेशन पुढे गेलं त्यांनी शांतपणे ऐकलं, एकदम टोकदार प्रश्न विचारले. मग म्हणाले चांगलं आहे हे सगळं, सत्ता बसली तर नक्की करून बघू. मी म्हणलं दादा मग फॉलोअप कसा घेऊ. त्यावर म्हणाले फॉलोअपमध्ये वेळ घालवू नका. निवडणुकीचे निकाल येऊ देत मगच या. उगाच येण्याजाण्यात वेळ आणि पैसे कशाला घालवता.
महाराष्ट्राच्या राजकारणातला असा क्लिअर, हो किंवा नाही हे स्पष्ट सांगणारा आणि ज्याला प्रशासन अंतर्बाह्य कळायचं असा नेता परत होणार नाही. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
पहिलीपासून हिंदी सक्तीला राज्यातून विरोध असल्याचे मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केल्याचे कळतंय ...
चक्क फडणवीसांच्या नागपुरातूनही हिंदीला विरोध असल्याचं नरेंद्र जाधव सांगतात ...
आता तरी राज्य सरकारने भानावर येऊन दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक न होता, महाराष्ट्रातील मराठी जनतेचा आवाज ऐकावा आणि आपला हिंदी भाषा सक्तीचा छुपा अजेंडा रेटू नये ...
‘खोट्या मतदार याद्या स्वच्छ करून निवडणुका घ्याव्यात’ याबाबत ही सरकारने राज्यातील मतदारांचे मत ऐकले तर काहीसा असाच निकाल येईल ...!!!
#सत्याचामोर्चा
#खऱ्यामतदारयाद्या
भारतीय जनता पक्षाचे नेते श्री. सुनील देवधर यांचा काल तिथीने (ललिता पंचमी ) साठावा वाढदिवस साजरा झाला. त्यांना भेटून शुभेच्छा देण्याचा योग काल जमून आला.
आम्ही दुपारी १ वाजता पोहचलो होतो, तेंव्हा हॉल पूर्ण भरलेला होता. आणि लोकं येतच होती. सुनीलजींचा गोतावळा किती मोठा आहे हे लक्षात येत होतं. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना प्रत्येकाचं नाव लक्षात होतं... ते प्रत्येकाशी किमान ५ वाक्य बोलत होते. प्रत्येकासोबत आवर्जून छान हसून फोटो काढत होते.
मी आणि योगेश खडीकर स्टेजवर गेलो तेंव्हा पुन्हा तोच प्रत्यय... मला म्हणाले बऱ्याच दिवसांत भेट नाही... मी म्हणलं आता मध्ये भेटलो तर म्हणाले १.५ वर्ष झालं, पुण्यात भेटलो इत्यादी... म्हणलं कमाल आहे या माणसाची.... रात्रीपर्यंत किमान १० हजार माणसं येऊन गेली असतील. तीच ऊर्जा तेच हास्य टिकवायचं हे सोपं नाही...
राजकारण एकूण सोपं नाही... नावडत्या माणसाला सुद्धा तो नावडता नाही हे जाणवू न देणं, आणि त्याला पण सामावून घेणं म्हणजे राजकारण... राजकारण ही पण एक कला आहे ती अवगत करणं खरंच अवघड आहे... सुनिलजी उत्तम संघटक आहेत... लतादीदी भक्त आहेत, त्यांना दीदींची ५ हजार गाणी पाठ आहेत... अनेक भाषा ते सहज बोलतात... बहुआयामी शब्दाचं प्रत्यक्ष रूप सुनिलजी आहेत.
त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.. @Sunil_Deodhar ji
नुकत्याच एका केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दांत सांगितलं की, सोशल मीडियावर व्यक्त होताना काही बंधनं नागरिकांनीच स्वतःच आणायला हवीत, अन्यथा कधीतरी ती जबाबदारी सरकारवर येईल आणि ते कोणालाच आवडणार नाही. पण मुळात मला जे आवडतं किंवा पटतं किंवा माझी मतं अधिक घट्ट करण्याचं म्हणजेच 'कन्फर्मेशन बायस' अधिक घट्ट करण्याचं काम सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स करत असतात. हेच आपल्याला कळत नाही, आणि ते कळावं म्हणून जगातील कुठलंच सरकार प्रयत्न करत नाही. हे सगळं किती गुंतागुंतीचं आहे आणि यासाठी स्वतःची तर्कबुद्धी (लॉजिकल थिंकिंग ) विकसित करावंच लागेल यावरचा आजच्या महाराष्ट्र टाइम्समधला लेख. लेखाची लिंक सोबत देत आहे. जमल्यास जरूर वाचा
https://t.co/lbbh9rZ7ge
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. विनोद तावडे यांचा आज वाढदिवस. मागच्या वर्षी म्हणजे २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात मी आणि माझा मित्र विवेक कुलकर्णी एका कामासाठी दिल्लीत गेलो होतो. दिल्लीतल्या मिटींग्स या संध्याकाळी होत्या, पण दिल्लीत आलोच आहोत तर जमेल तितक्या लोकांना भेटायचा प्रयत्न केला पाहिजे हा शिरस्ता लक्षात ठेऊन कोणाला भेटता येईल याची यादी करत असताना, विवेक म्हणाला की विनोद तावडेंना भेटता येतंय का बघतो. त्याने विचारणा केली, त्यांचं उत्तर आलं की या दुपारी.
आम्ही दिल्ली एअरपोर्टला उतरलो आणि दुपारी १२.४५ च्या आसपास त्यांच्या घरी गेलो. विवेकचा आणि त्यांचा जुना स्नेह, पण माझी पहिलीच भेट. पण त्यांनी क्षणांत सगळी औपचारिकता दूर केली. माझ्याशी छान गप्पा सुरु केल्या. नवीन माणसाला आपलंस कसं करायचं याचं ते उत्कृष्ट उदाहरण मला वाटलं.
मग ते म्हणाले की जेवण तयार आहे जेवण इथेच करून जा... आम्ही दोघे संकोचत होतो हे पाहून म्हणाले की," जेवल्याशिवाय जाता येणार नाहीच आहे तुम्हाला... खरंतर मी तुमच्यासोबत जेवणार होतो, पण एका केंद्रीय मंत्र्याकडे मला जायचं आहे. पण तुमचं जेवण झाल्याशिवाय मी जाणार नाही..."
त्यांची त्या मंत्र्यासोबतची भेटीची वेळ १.३० ची होती पण त्यांनी तिकडे फोन करून सांगितलं की मला थोडा उशीर होईल. मला तावडेंसोबत बोलताना एक जाणवलं की हा माणूस प्रांजळ आहे, समोरच्याचं मत ऐकून घेतो आणि त्या व्यक्तीची पण एक भूमिका असू शकते हे त्यांना मान्य असतं. आमचं जेवण झालं, फोटो झाला, त्यांची निघायची लगबग सुरु झाली, तेंव्हा आम्ही त्यांचं पुस्तकांचं कपाट न्याहाळत होतो... निघताना म्हणाले दिल्लीत काही मदत लागली तर सांगा आणि यातलं आवडेल ते पुस्तक घेऊन जा.
गाडीत बसले आणि एक मिनिट पण झालं नसेल तर परत विवेकला फोन करून म्हणाले की पुस्तक नक्की घेऊन जा दोघेही जणं आणि कुठलं नेलंत ते कळवा...
दिल्ली मराठी माणसाला मानवत नाही, तिकडे कायम सावध असावं लागतं, आणि दिल्लीतील घरं जशी मोठी असतात तसं मन मोठं करून त्यात सगळं सामावून घ्यावं लागतं. जे विनोद तावडेंना १००% जमलंय. २०१९ ला विधानसभेचं तिकीट त्यांना मिळालं नाही पण २०२४ ला त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी घोषित केली, हे सोपं नाही. राजकारण हा कमालीचा पेशन्सचा गेम आहे जो तावडेंना उत्कृष्ट जमलाय असं दिसतंय.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा फोटो आणि ती भेट आठवली. श्री. विनोद तावडे यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा ! @TawdeVinod
'वेव्ह्स समिट ' हा अनुभव उत्कृष्ट होता, पण एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे मराठी नाट्यक्षेत्र हे पण एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीचाच भाग आहे, इव्हेन्ट महाराष्ट्र, मुंबईत आहे, तिथे मराठी नाट्यक्षेत्र हे किती ऍक्टिव्ह आहे हे दाखवणारा एक वेगळा स्टॉल हवा होता. भारत आणि जगभरातून लोकं आले होते, त्यांना महाराष्ट्रात जितकी नाट्यसृष्टी सक्रिय आहे तितकी कुठे नाही हे दाखवण्याची संधी होती. पुढच्या समिटला सरकार याचा विचार करावा ही विनंती.
@WAVESummitIndia@ShelarAshish@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
काल मुंबईतल्या 'वेव्ह्स' समिटला गेलो होतो. ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकं कुठून कुठून आली होती. गुगल म्हणजे अल्फाबेटचा स्टॉला नव्हता पण जगातील बऱ्याच मोठ्या कंपन्या होत्या , भारतातील तर एन्टरटेनमेन्ट क्षेत्रातील जवळपास सगळ्या कंपन्या होत्या. आणि सुरुवातीला मला जसं वाटलं होतं तसं नव्हतं, लोकं फक्त पीआर करायला संधी म्हणून नव्हती आली, ते नवीन काय चाललंय हे बघायला आले होते.
सगळ्यात तुफान गर्दी 'मेटा'च्या स्टॉलवर होती. आणि त्या खालोखाल गेमिंग सेक्शनमध्ये जिथे व्हर्च्युअल रिऍलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटीचे खूप प्रयोग दाखवले होते.
अनेक राज्यांनी आपापले स्टॉल्स लावले होते की आमच्या आमच्या राज्यात शूटिंगच्या काय संधी आहेत इत्यादी. या सगळ्यात एक उणीव जाणवली ती म्हणजे महाराष्ट्राच्या स्टॉलमध्ये महाराष्ट्र प्रमोट करावा असा विशेष प्रयत्न दिसला नाही. इव्हेन्ट महाराष्ट्रात आहे, एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्री मुंबईतच आहे त्यामुळे महाराष्ट्राची ताकद सगळ्यांना माहीत आहे असं वाटून काही वेगळं करण्याचा प्रयत्न नव्हता.
त्या इव्हेंटमध्ये एक हंगेरीहून आलेला माध्यम उद्योजक भेटला. त्याला भारताच्या एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीबद्दल कुतूहल होतं पण महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल पण तितकंच कुतूहल होतं. इथे प्रत्येक राज्याची वेगळी इंडस्ट्री आहे, तिचं इकॉनॉमिक्स आहे असं त्याला मी सांगत होतो, ते सांगताना मी त्याला सहज सांगितलं की मराठी नाटक क्षेत्र हे खूप चांगलं सुरु आहे आणि ते पण अनेक दशकं. पण समजा त्याला त्याची झलक दाखवायची असती तर मराठी नाट्यसृष्टीचा मागमूस नव्हता. का असं ?
नाटक ही एक इंडस्ट्री म्हणून महाराष्ट्रात जितकी फोफावली आहे तितकी देशात इतर कुठे असेल असं नाही, मग त्याला देशभरातून किंवा जगभरातून आलेल्या लोकांसमोर प्रमोट करण्याची संधी सरकारने का गमावली हे कळलं नाही. असो... पण या समिटने आपल्याला किती गोष्टी माहित नाही हे भान जरूर आणलं.