माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।
सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा.
मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात.
पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अभ्यास उत्तम आहेच आणि फक्त त्यांचं ज्ञान, माहिती ही जर रंजक पद्धतीने त्यांनी ह्या समाज माध्यमांवर सांगितली तर?
विकिमीडिया फाउंडेशनचं, 'विकिपीडिया' तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. ह्याच विकिमिडीया फाउंडेशनच्या 'विकिसोर्स', 'विकीमीडिया कॉमन्स', 'विकिव्हॉयेज', 'विकिस्पिशिज' सारख्या आभासी मंचांचा वापर ज्ञान मराठीतून देण्यासाठी करणं सहज शक्य आहे. विकिमिडीया सारख्या आभासी मंचावर तर ध्वनी, चित्रफीत स्वरूपात पण ज्ञान माहिती प्रसारित करणं शक्य आहे. ह्या सगळ्याचा मुक्त आणि प्रभावी वापर व्हायला काहीच हरकत नसावी. (विकिपीडिया हा 'प्लॅटफॉर्म' आहे पण त्याला 'आभासी मंच' शब्द वापरला आहे, असे पर्यायी शब्द पण प्रचलित व्हायला हवेत.)
मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा, लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या मराठी इन्फ्ल्यूअन्सर्सचा सत्कार केला होता. पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजमाध्यमांवर मराठी ही ज्ञानाची भाषा बनवणाऱ्यांचा सुद्धा योग्य आदर व्हायला हवा. ह्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईलच !
पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
भाषेविषयी आणि आपल्या राज्याविषयी इतक्या तळमळीने बोलणारा राज ठाकरे नावाचा माणूस जर पश्चिम बंगाल, तामिळनाड, ओरीसा अशा ठिकाणी असता तर त्यांनी डोक्यावर घेतला असता !!! आता तरी महाराष्ट्राने, मराठी माणसाने याचा विचार करायला हवा.
#मराठी#मराठीविश्वसंमेलन#MNSadhikrut#rajthackeray
महाराष्ट्रावरच्या राजकीय - सामाजिक - सांस्कृतिक क्षितिजावरचं मळभ दूर करू या.. आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी सज्ज होऊ या ! आपणा सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
#NewYearWishes#HappyNewYear#Welcome2024