पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं.
सरकार अशा घटनांमध्ये जेंव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेंव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही ?
या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत ? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का ?
या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, महाराष्ट्राचं 'लक्ष' आणि 'लक्ष्य' विचलित झालं आहे... आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही.
'सत्ता' मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासुर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे त्याने महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे. प्रत्येकाला या ना त्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे. राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे. हल्ली लेखकांना पण साहित्य संमेलनाच्या मार्फत सत्ता गाजवायचा मोह होतो. अगदी एशियाटिक सारख्या संस्थेत सुद्धा सत्तेची लढाई पेटते, आणि एकूणच सत्तेच्यासाठी वाट्टेल ते याचं असं काही उदात्तीकरण होत आहे की हाच पुरुषार्थ वाटतो. जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब खाली उमटत असतं. अगदी दुबळा माणूस सुद्धा या सगळ्यात सैरभैर होऊन आपल्यापेक्षा दुबळ्यांच शोषण करतो.
याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं, कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचे. राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता, समाजात प्रत्येकाकडे कोणाचं तरी कोणाकडे लक्ष असायचं तेच हललं आहे.
पूर्वी आपल्याकडे कोणीतरी बघतंय, उद्या काही केलं तर आपली, आपल्या घरच्यांची समाजात छीथू होईल ही भीती असायची तीच आता नष्ट झाली आहे . हे गंभीर आहे. समाजात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात. त्यातल्या वाईट प्रवृत्तींवर समाजाची, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीस झालेल दिसतंय.
हाताबाहेर गेलेली लालसा +सत्ता गाजवण्याची हाव + ओटीटी वरचा कन्टेन्ट + पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणे आणि मोबाईल मधे सतत गुंतून राहणे याने सगळी घडी विस्कटली आहे.
या आणि अशा घटनांनी महाराष्ट्र अधिक जखमी होत आहे याचं भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे . मी नेहमी माझ्या भाषणांत सांगतो की १९९५ नंतर महाराष्ट्र आरपार बदलला. १९९२ पासून जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले गेले . उदारीकरणाचे वारे देशभर घुमू लागले , परंतु हे वारे आपण निट समजूनच घेतले नाहीत .उदारीकरणाने प्रचंड फायदे झाले पण जिथे आम्हाला लोकशाहीच समजली नाही तीथे उदारीकरण काय समजणार ? उदारीकरणाने सगळी जुनी मूल्यव्यवस्था उध्वस्त केली आणि नवी व्यवस्था इतकी व्यक्तिकेंद्रित आणि लालसाकेंद्रित केली की जर आपण आजच यावर सर्वांगाने विचार केला नाही तर मात्र आपला वाली कोणीच नाही हे नक्की.
मी माझा पक्ष याच समाजाचा घटक आहोत. ज्या ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की. अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं 'लक्ष' आणि भरकटलेलं 'लक्ष्य' पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं !
राज ठाकरे |
And here it is....#AnthemChhatrapati...
RITEISH DESHMUKH has delivered one of the grandest songs in Marathi cinema. Absolute grandeur in both vision and execution, with stunning visuals that elevate every frame.
Ajay-Atul have once again delivered an unforgettable composition that is bound to stand as one of the most memorable highlights of their career.
#RajaShivaji #AjayAtul @Riteishd@AjayAtulOnline@remodsouza@SIDDHARTH23OCT@geneliad
https://t.co/qt3uos5688
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
मुंबई क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई येथे एक लाख आसनक्षमता असलेलं क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न करत आहे.
जवळच एक स्टेडियम आहे, मुंबईत दोन आहेत. ह्या स्टेडियमची गरज आहे का? आपलं प्राधान्य कशाला असलं पाहिजे?
नवं आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणारं विमानतळ जवळच आहे म्हणजे फक्त क्रिकेट स्टेडियम इतकंच आपल्याला का सुचतं?
ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास ह्याचं दर्शन होईल असं Maharashtra International Centre किंवा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र का उभारू नये? जिथे मराठी संस्कृतीची ओळख करून देणारं वस्तुसंग्रहालय असेल, भव्य ग्रंथालय असेल जिथे मराठीतील प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक तर असेलच परंतु जगातील इतर भाषांमध्ये मराठी संस्कृतीविषयी जे जे अक्षर लिहिलेलं असेल ते सर्व असेल. दुर्मिळ जुनी मराठी पुस्तकं जतन केली जातील.
मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होऊ शकतील असं कन्वेन्शन सेंटर असेल. महाराष्ट्रातील पुरातत्व (Archaeology) अभ्यास केंद्र असेल, मानववंशशास्त्र (Anthropology) संशोधनकेंद्र असेल.
मराठी संस्कृतीचं दर्शन जगाला करून देण्याची ही नामी संधी आहे.
#मराठी #महाराष्ट्र @CMOMaharashtra
आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान.
आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे.
हर हर महादेव.
https://t.co/wH2UMUk7Z7
“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!!!”
दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं..छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे.
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
राज ठाकरे ।
मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही...
आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.
या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.
हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही... पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट जरूर पहा...
राज ठाकरे ।
On my way to the ground in Delhi and my heart sank when I saw people feeding a whole army of pigeons. Doctors have been shouting from the rooftops about the dangers of inhaling pigeon droppings and the severe lung disease it could lead to. Please, let us stop feeding pigeons.