दारावरची टकटक !
केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर 'मर्चंट डिस्काउंट रेट' अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, 'डिजिटल सापळा' लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच 'डिजिटल सापळ्यात' पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे.
सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली ?
ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केली ०.४% एमडीआर लागू होणार ? आणि सरकारचं म्हणणं आहे की हा भार व्यापाऱ्यांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत ? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का ? उत्तर आहे अजिबात 'नाही'.
पुन्हा सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही म्हणून अन्यथा त्यावर पण त्यांना १८% जीएसटी लावायचा आहे. त्यामुळे त्यांनी या एमडीआरवर पण जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशांत जाऊन युपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेंव्हा परदेशांत जातील तेंव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का ?
काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं आहे म्हणून. मला त्याबद्दल माहित नाही. पण हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असं सरकार ठाम सांगू शकेल ? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वतःची तिजोरी भरून काढायला वापरला.
प्रश्न चार पैसे किंवा चाळीस रुपयांचा नाही. प्रश्न सरकारच्या हेतूचा आहे. नोटबंदी असेल किंवा डिजिटल पेमेंट व्यवहार असतील यात सरकारचे हेतू कधीच स्वच्छ दिसले नाहीत. UPI चालवण्याचा खर्च कोण करणार, याचा विचार व्यवस्था उभी करतानाच व्हायला हवा होता. जो केला नाही किंवा करायचा नाही असं आधीच ठरलं होतं. २०२२ ला अर्थ खात्याने असं स्वच्छ सांगितलं होतं. पण हे सांगताना मी म्हणलं तसं कधी तुमच्या खिशात हात घालायचा हे पण ठरलं होतं. आणि दोन माणसांच्या व्यवहारांवर शुल्क लावत नाही आहोत असले भंपक युक्तिवाद सरकारने करू नये. तुम्ही डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एमडीआरचा निषेध नोंदवते. हे शुल्क भरण्यास व्यापाऱ्यांनी सपशेल विरोध करावा.
( २१ ऑगस्ट २०२२ ला सरकारने युपीआय व्यवहारांवर कुठलंही शुल्क असणार नाही असं घोषित केलं होतं, त्या ट्विटचा स्क्रिनशॉट मुद्दामून इथे जोडत आहे )
राज ठाकरे ।
दोन्ही बाजूने गाड्या पार्किंग केल्यामुळे दररोज शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो व उशिरा शाळेत पोहचावे लागते
आपण विनंती तात्काळ तोडगा काढावा !
पत्ता : दत्तानी सोसायटी , धीरज बिल्डिंग संपूर्ण भाग , गोरेगाव (प ) लिंक रोड मुं 400104
@MumbaiPolice@MTPHereToHelp
अनधिकृत रित्या प्रचंड प्रमाणात केबल रस्त्यावर लटकत आहेत @mybmcWardPS आपणास विनंती तात्काळ बंदोबस्त करावा !
पत्ता : भगतसिंग नगर नं 1 च्या नाक्यावर , लिंक रोड , गोरेगाव ( प ) मुं 400104
@mybmc@MumbaiPolice@CPMumbaiPolice
I appeal to Mumbai police @MumbaiPolice and Maharashtra FDA , @mybmchealth, @Tukaram_IndIAS to take strict action against culprit who all are doing this..
This is not the first case…this is happening on regular basis who paid the bill
नाला सफाई चा कचरा तसाच पडून आहे.
Pपरिसरात मच्छर चे थैमान रोगराई निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून कचरा तसाच साचलेला आहे !
पत्ता : भगतसिंग नगर 1 , काळा गणपती मंदिर , नयानगर पाठी मागे , लिंक रोड , गोरेगाव (प ) मुं 400104
@mybmc@mybmcWardPS@TawdeRitu@Dev_Fadnavis
केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे .
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं.
काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला !
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे.
आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा.
लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे !
या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन आला की झाडं लावून त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो. आणि त्यातली ९०% झाडं पर्यावरण दिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहित. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा.
२०१४ साली मी जेंव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेंव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरु आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आत्ता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?
हल्ली सगळ्यांना जरा मोठ्या आकड्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे म्हणलं जरा काही गंभीर आकडे मी पण तुमच्यासमोर ठेवतो.
यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या प्रॉडक्टिव्हिटीचं झालेलं नुकसान हे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते असा अंदाज वल्ड बँकेचा आहे. एका जागतिक अभ्यासाप्रमाणे देशातील ५७% जिल्हे ज्यात देशाची ७६% लोकसंख्या राहते, हे जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत.
जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची अशी आकडेवारी टाकतो तेंव्हा या आकडेवारीचा विचार पण करणार आहोत का ?
आज पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललं आहे, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. थोडक्यात आपण जिथे जगतोय तिकडे ८ महिने आपल्याला धड जगता येत नाहीये, याची खंत आपल्याला का वाटत नाहीये? माझा विकासाला विरोध नाही, रस्ते, पूल हे करा ते आवश्यक आहेतच, पण ते करताना आपण आपली शहरं धड जगायला लायकीची करत आहोत का याचा विचार का होत नाही? पावसांत ग्रामीण भागात पिकं वाहून जातात आणि शहरी भागांत गाड्या पाण्यावर तंरगतात आणि तरीही आपण जे सुरु आहे त्याला विकास म्हणून खुश होणार आहोत का?
बरं सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते.
१७३९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली.
आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की.
आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.
निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल.
राज ठाकरे ।
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत.
आणि सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का ?
सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं.
हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे. सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे. आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत.
उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय. याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत ? आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे.
आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
मागील अनेक दिवसांपासून सिंग्नल बंद आहे आणि त्यामुळे वाहनांचा गोंधळ निर्माण होतोय !
पत्ता : लो.सा. अण्णा भाऊ साठे चौक , लिंक रोड , गोरेगाव (प ) मुंबई 400104
@MTPHereToHelp@MumbaiPolice@CPMumbaiPolice
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आदेशांना जुगारून इंग्रजीत नाम फलख लावलेला आहे !
@mybmc@mybmcWardPS आपणास विनंती तात्काळ कायदेशीर कारवाही करून मराठीत नाम फलख करावे अशी आपणास विनंती
पत्ता : बेस्ट कॉलोनी रोड , गोरेगाव (प ) नीता इमारत समोर , मुं 40014
रस्त्यावरच्या वाळू मुळे अनेक अपघात होत आहेत
@mybmcWardPS आपणास विनंती तात्काळ काही तरी उपाय योजना करावी !
पत्ता : हार्मोनी मॉल समोर , लिंक रोड,गोरेगाव (प ) मुं१०४
@mybmc#deathroad#mumbai